सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये गोल होऊ देण्याच्या सवयीमुळे भारतीय हॉकी संघाने अनेक सामने गमावले आहेत. गोल होऊ देण्याच्या मानसिक विकारातून खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी मुख्य प्रशिक्षक पॉल व्हॅन अॅस यांनी संघासाठी पूर्णवेळ मानसशास्त्रज्ञ असावा असा प्रस्ताव मांडला आहे.
याआधीचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांच्या काळात डॉ. चैतन्य श्रीधर यांनी भारतीय संघासोबत काही काळ काम केले होते. यासंदर्भात भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि हॉकी इंडिया योग्य निर्णय घेतील, असा विश्वास अॅस यांनी व्यक्त केला.
अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने सुरुवातीच्या तीन सामन्यांत शेवटच्या मिनिटांमध्ये गोल होऊ दिला. या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाची पीछेहाट झाली. ऊर्वरित सामन्यांमध्ये कामगिरी सुधारत भारतीय संघाने कांस्यपदक नावावर केले. गोल होऊ देणे मानसिक आहे. खेळाडूंनी खेळाचा आनंद घ्यायला हवा. ते दडपण घेतात आणि तिथेच चुका होतात. हे टाळण्यासाठी मानसशास्त्रज्ञ उपयुक्त ठरू शकतो.
– पॉल व्हॅन अॅस, भारताचे हॉकी प्रशिक्षक