भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी नुकताच पंतबद्दल मोठा खुलासा केला आहे. पंतवर मी एकदा रागावलो होतो आणि त्याने मध्यरात्री येऊन माफी मागितली होती, असे सिन्हा यांनी सांगितले. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून पंत भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. त्याने आपल्या खेळीत सुधारणा करत अधिक जबाबदारीने खेळायला सुरुवात केली. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा – WTC FINAL : टीम इंडियाची नवी ‘RETRO जर्सी’ तुम्ही पाहिली का?
तारक सिन्हा यांचे पंतच्या कारकीर्दीत खूप योगदान दिले आहे. ते दिल्लीतील आयकॉनिक क्लब सोनेटचे मुख्य प्रशिक्षक होते आणि ऋषभ पंतने आपले सुरुवातीचे बरेच दिवस तिथेच घालवले. प्रशिक्षण घेताना तारक सिन्हा एकदा ऋषभ पंतवर खूप रागावले. तेव्हा पंतने काय केले याबाबत सिन्हा यांनी खुलासा केला. ते म्हणाले, ”एकदा दक्षिण दिल्लीतील माझ्या क्लबमध्ये नेट सेशनच्या वेळी मला ऋषभ पंतचा राग आला. त्याला रात्रभर झोप येत नव्हती आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास येऊन त्याने माझा दरवाजा ठोठावला. मी वैशालीमध्ये राहतो आणि ऋषभ पंत तेथून एक तासाच्या अंतरावर राहत होता. रात्री त्याला पाहून मला आश्चर्य वाटले. त्याने मला सांगितले, की मला माफी मागायची आहे कारण तो मला अस्वस्थ पाहू शकत नाही. मध्यरात्री तो माझ्या घरी आला होता. पण ते माझ्यासाठी विशेष होते. पंतवर मी रागावल्याचे पाहून माझे कुंटुबही माझ्यावर रागावले होते.”
हेही वाचा – ठरलं तर! यूएईत होणार IPL २०२१चा उर्वरित हंगाम
पंतच्या कामगिरीचा वाढता आलेख पाहून इंग्लंडचा आघाडीचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सने भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबाबत मोठी प्रतिक्रिया दिली होती. ”मला कसोटी क्रिकेट फारसे आवडत नाही, पण जेव्हा ऋषभ पंत फलंदाजीला येतो, तेव्हा मी त्याची खेळी नक्कीच पाहतो”, असे मिल्सने पंतची प्रशंसा करत म्हटले होते.