भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष शरद पवार यांनी क्रिकेटला वाव मिळावा म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)साठी वांद्रे कुर्ला संकुलात १३ एकरचा भूखंड अत्यल्प किमतीत राज्य सरकारकडून पदरात पाडून घेतला आणि त्यानंतर बांधकाम व्यावसायिक अजय शिर्के यांच्या सहकार्याने या भूखंडाचा व्यावसायिक वापर करून एमसीएने ३०० कोटींहून अधिक रकमेचा लाभ त्यातून मिळवल्याचा गंभीर आरोप ‘आम आदमी पार्टी’च्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी केला.
शरद पवार यांनी फेब्रुवारी २००१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पत्र लिहीत क्रिकेटच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या एमसीएला मोफत भूखंड देण्याची मागणी केली. ही संघटना सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून काम करत असून या भूखंडाचा वापर परिसरातील तरुणांनाही करण्याची परवानगी असेल, अशी ग्वाही या पत्रात देण्यात आली. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वांद्रे-कुर्ला संकुलात ५२,१५७ चौरस मीटरचा भूखंड ८० वर्षांच्या भाडेकराराने अवघ्या दोन कोटी पाच लाख रुपयांना एमसीएला दिला. मात्र, त्याच वेळी या भूखंडाचा व्यावसायिक वापर होणार नाही, अशी अट त्यात टाकली, याकडे दमानिया यांनी लक्ष वेधले.
भूखंड ताब्यात येताच एमसीएने पाच कोटी रुपयांचा मूळ प्रकल्प गुंडाळला आणि टेनिस कोर्ट, स्क्वॉश कोर्ट, जलतरण तलाव, रेस्टॉरंट आदी सुविधा असलेला आलिशान क्लब उभारण्याचा ७५ कोटींचा प्रस्ताव तयार केला. हे काम बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वावर अजय शिर्के यांच्या ‘बी. जी. शिर्के इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला देण्यात आले. हा क्लब बांधून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी १५ लाख शुल्काचे तीन हजार सभासदत्व देण्याचे अधिकार शिर्के यांना देण्यात आले. शिर्के यांना या व्यवहारात ७५ कोटींचा खर्च वजा जाता थेट २८५ कोटी रुपयांचा लाभ झाला. तर प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या २३०० सभासदत्वाच्या विक्रीतून ‘एमसीए’ला ३४५ कोटी रुपये मिळाले, असा आरोप दमानिया यांनी केला.