scorecardresearch

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : नितू, निकहत, अमितचे सोनेरी यश

२०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितने अंतिम लढतीत इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डला पराभूत केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : नितू, निकहत, अमितचे सोनेरी यश

बॉक्सिंग

बर्मिगहॅम : भारताच्या नितू घंगास (४८ किलो), निकहत झरीन (५० किलो), अमित पंघाल (५१ किलो) यांनी रविवारी राष्ट्रकुल स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदके पटकावली.

२०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितने अंतिम लढतीत इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डला पराभूत केले. पंचांनी अमितच्या बाजूने ५-० असा कौल दिला. पदार्पणवीर नितूनेही अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी रेसटनला ५-० असे नामोहरम करताना सोनेरी यश संपादन केले. तसेच जागतिक विजेत्या निकहतने सुवर्णपदकाच्या लढतीत नॉर्दन आर्यलडच्या कार्ली मॅक नॉलवर ५-० असा विजय मिळवला.

हॉकी : भारतीय महिला संघाची कांस्यकमाई

कर्णधार आणि गोलरक्षक सविता पुनियाच्या निर्णायक कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी न्यूझीलंडवर शूटआऊटमध्ये २-१ अशा फरकाने विजय मिळवत कांस्यपदकाची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला संघाचे हे १६ वर्षांतील पहिले पदक ठरले.

सामन्याच्या २९व्या मिनिटाला सलिमा टेटेने मिळवून दिलेली १-० अशी आघाडी भारताने बराच वेळ टिकवली. मात्र, सामना संपण्यास ३० सेकंदांचा अवधी शिल्लक असताना न्यूझीलंडच्या ऑलिव्हिया मेरीने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यामुळे विजेता संघ ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.

शूटआऊटमध्ये पहिल्या प्रयत्नात मेगन हलने गोल करत न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली. यानंतर सविताने रोज टायनन, कॅटी डोअर व ऑलिव्हिया शॅनन यांचे प्रयत्न हाणून पाडले. तर भारताकडून सोनिका व नवनीतने गोल करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

बॅडिमटन : सिंधू, लक्ष्य अंतिम फेरीत

दोन ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू आणि युवा लक्ष्य सेन यांनी राष्ट्रकुलच्या बॅडिमटनमध्ये अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरी गटाची अंतिम फेरी गाठली. सिंधूने सिंगापूरच्या येओ जिया मिनला २१-१९, २१-१७ असे पराभूत केले. लक्ष्यनेही सिंगापूरच्या जिया हेंग तेहवर २१-१०, १८-२१, २१-१६ असा विजय साकारला. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने मलेशियाच्या शेन पेंन सून आणि टिआन किआन मेन जोडीला २१-६, २१-१५ असे सरळ गेममध्ये नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अनुभवी किदम्बी श्रीकांत, महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद व ट्रिसा जॉली जोडी पराभूत झाली.

स्क्वॉश : पल्लिकल-घोषालला कांस्य

भारताच्या दीपिका पल्लिकल-सौरव घोषाल या अनुभवी जोडीने स्क्वॉश क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले. पल्लिकल-घोषालने ऑस्ट्रेलियाच्या डोना लोब्बन आणि कॅमेरून पिल्ले जोडीचा ११-८, ११-४ असा पराभव केला. हे भारताचे ५०वे पदक ठरले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Commonwealth games 2022 indian boxers performance zws