भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमधील (आयसीसी) भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांचे वर्चस्व संपुष्टात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आयसीसीमध्ये घटनात्मक पुनर्रचना करण्यात येणार असल्याची दाट शक्यता असून त्यानुसार अध्यक्षांकडे स्वतंत्र कारभार देण्यात येणार आहे.
एन. श्रीनिवासन आयसीसीचे अध्यक्ष असताना त्यांनी घटनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले होते. त्यानुसार आयसीसीच्या तिजोरीची किल्ली भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), इंग्लंड क्रिकेट मंडळ (ईसीबी) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) यांच्याकडे देण्यात आली होती. आयसीसीचे वित्तीय आणि व्यावसायिक व्यवहार पाहण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले होते आणि या समितीमध्ये बीसीसीआय, ईसीबी आणि सीए या तीन संघटनांनाच स्थान देण्यात आले होते. त्याचबरोबर या तिन्ही संघटनांना आयसीसीच्या मिळकतीमधून मोठा वाटा मिळत होता.
यापुढे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठीही काही नियम बनवण्यात येणार आहे. याबाबत आयसीसीने पत्रकात म्हटले आहे की, ‘‘आयसीसीच्या अध्यक्षाकडे त्यांच्या सदस्य संघटनेतील कोणतेही पद नसावे, असा नवीन नियम यापुढे बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेला उमेदवार आयसीसी मंडळाचा आजी-माजी संचालक असणे अनिवार्य असेल आणि त्यांना दोन संचालकांचा पाठिंबा हवा. घटनेची आम्ही पुनर्रचना करणार असून जून २०१६ नंतर नवीन नियमांनुसार कामकाज करण्यात येणार आहे.’’
सदस्य आणि समभागधारक यांच्याबरोबरचे नाते अधिक सुदृढ व्हावे, असे आयसीसीला वाटते. क्रिकेटचा प्रसार जगभरात व्हावा यासाठी काही विशेष प्रयत्न आयसीसीकडून होणार आहेत.
‘‘क्रिकेटची प्रतिमा अधिक स्वच्छ व्हावी, व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि सर्व देशांना आयसीसी समान वाटावी, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. कोणताही सदस्य हा आयसीसीपेक्षा मोठा नाही,’’ असे आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सांगितले.
आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा २७ जून ते २ जुलै या कालावधीमध्ये होणार आहे. या वेळी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. अमेरिकेतील क्रिकेटच्या विकासाबद्दल या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला. युवा विश्वचषकासाठी (१९ वर्षांखालील) पात्रतेचे निकषही या वेळी ठरवले आहेत. आगामी युवा विश्वचषक १२ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीमध्ये न्यूझीलंडला होणार आहे. या स्पर्धेसाठी दहा कसोटी क्रिकेट खेळणारे संघ थेट पात्र ठरतील. त्याचबरोबर सध्या सुरू असेलल्या विश्वचषकात जेतेपद पटकावलेल्या संघाला थेट प्रवेश देण्यात येईल. अन्य देश पात्रता फेरीमधून निवडले जातील.
लाचलुचपत प्रतिबंधक निरीक्षण गटात द्रविड
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नव्याने स्थापना केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक निरीक्षण गटात भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. ‘‘लाचलुचपत प्रतिबंधक निरीक्षण गटामध्ये कार्यकारी समितीचे अध्यक्ष, राहुल द्रविड, कायदेशीर सल्लागार लुईस वेस्टॉन आणि स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधविरोधी सल्लागार, लाचलुचपत प्रतिबंधविरोधी समितीचे अध्यक्ष, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन आणि आयसीसीच्या काही माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे,’’ असे आयसीसीने पत्रकात म्हटले आहे.