…तर कदाचित यापुढे फलंदाजांना सहज नाही मारता येणार षटकार

प्रायोगिक तत्वावर यासंदर्भातील कामाला सुरुवात

ms dhoni
महेंद्रसिंग धोनी ( संग्रहीत छायाचित्र)

क्रिकेट म्हटल्यावर हल्ली अनेकांच्या तोंडी ‘चौकार- षटकारांची बरसात…’ ‘ये मारा..’ असं म्हणत व्यक्त होणारा आनंद आणि ओसंडून वाहणारा उत्साहच पाहायला मिळतो. पण, आता लवकरच क्रिकेटच्या मैदानातून षटकारच नाहीसे होण्याची शक्यता आहे. क्रिकेटमध्ये काही वर्षांपासून ‘टी२०’चं वाढतं प्रस्थ पाहता त्यावर अनेकांनी नाकं मुरडली, हेच खरं क्रिकेट आहे का? असा प्रश्नही काही दिग्गजांच्या मनात घर करुन गेला.

‘टी२०’मुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटकडे दुर्लक्ष होत असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. कसोटी प्रकारात एकही चौकार न मारता दिवसभराचा खेळ संपेपर्यंत मैदानावर टिकून राहणाऱ्या खेळाडूची बरीच प्रशंसा केली जात होती. टी२० मध्ये पहिल्या पाच मिनिटांत मोठा शॉट मारला नाही, तर त्याच खेळाडूची निंदाही केली जाते. हे एकंदर गणित आणि गेल्या काही वर्षांपासून टी२० क्रिकेट सामन्यांची वाढती लोकप्रियता पाहता आता लवकरच खेळाडूंच्या फलंदाजीमध्ये काही बदल होण्याची चिन्ह आहेत. फलंदाजांची फटकेबाजी आणि बॅटच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये केलेले बदल पाहता बऱ्याच सामन्यांमध्ये गोलंदाजांपेक्षा फलंदाजांचच पारडं वजनदार असल्याचं पाहायला मिळतं. पण, आता मात्र याप्रकरणी काही पावलं उचलण्यात येत आहेत.

बॅटच्या डिझाईनमध्ये बदल होणार..
फलंदाजीमध्ये होणारी फटकेबाजी पाहता काही दिग्गज गोलंदाजांनी या सर्व परिस्थितीबद्दल खंत व्यक्त केली. त्यांच्या मते, सामन्यांमध्ये गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनाही त्यांच्या खेळाचं सादरीकरण करण्याची योग्य संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय सर्जनने फलंदाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटच्या निर्मिती आणि डिझाईनमध्ये काही आवश्यक बदल करण्यास सुरुवात केली आहे.

अस्थिरोग तज्ज्ञ चिन्मय गुप्ते लंडनच्या इम्पेरियल कॉलेजमधील क्रिकेट संघाच्या साह्याने या प्रकल्पावर काम करत आहेत. गुप्ते यांच्या मते, गेल्या ३० वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये चौकार- षटकारांचं प्रमाण वाढण्यामागचं मुख्य कारण आहे बॅट बनवण्याची प्रक्रिया. ज्यामुळे सध्या गोलंदाजांवर दबाव असल्याचंही पाहायला मिळत आहे.

तेव्हा आता गुप्तेंनी या मुद्द्यावर जास्त लक्ष देत अशा प्रकारे बॅटची आखणी केली आहे ज्यामध्ये बॅटच्या किनाऱ्याची जाडी ४० मिली मीटरपेक्षा कमी असेल आणि वक्रभाग ६७ मिली मीटरपेक्षा जास्त नसेल. गुप्तेंच्या डिझाईनप्रमाणे बॅट बनवल्यास त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाजांना त्यांचा खेळ दाखवण्याची योग्य संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे गुप्ते यांच्या या प्रयोगाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातून काय प्रतिक्रिया मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cricket bating batsman british indian surgeon chinmay gupte leads cricket bat design research cricket bats

ताज्या बातम्या