दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डातील सात सदस्यांना करोना विषाणूची लागण झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. क्रिकेट बोर्डाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करुन घेतली होती. या चाचणीचे निकाल आल्यानंतर ज्यात अधिकाऱ्यांपासून, प्रशिक्षक व खेळाडूंचाही समावेश होता. शंभरपेक्षा जास्त सदस्यांची चाचणी केल्यानंतर आलेल्या अहवालात ७ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. येत्या काही दिवसांत आणखी सदस्यांची करोना चाचणी करणार असल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

“येत्या काळात निश्चीतच आम्ही आणखी सदस्यांची चाचणी करणार आहोत. १०० पेक्षा जास्त सदस्यांची चाचणी केल्यानंतर ७ जणांना करोनाची लागण होणं हा आकडा खरंतर नगण्य आहे, पण तरीही आम्ही सर्व ती काळजी घेणार आहोत.” क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक फॉल यांनी Sports24 या वाहिनीशी बोलताना माहिती दिली. मात्र पॉजिटीव्ह आढळलेल्या ७ अहवालांमध्ये कोणत्या खेळाडूचा समावेश आहे का हे सांगायला फॉल यांनी नकार दिला आहे. नियमाप्रमाणे पॉजिटीव्ह रुग्णाची माहिती सांगण्याची परवानगी नसल्याचं फॉल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.