भाग १ : क्रिकेट शिबीर
शाळा-महाविद्यालयांना सुट्टय़ा लागल्या की आपसूकच शिबिरांचे वेध लागतात. यामध्ये उन्हाळी क्रीडा शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळतो, ज्यामध्ये क्रिकेट प्रशिक्षण शिबिराला सर्वाधिक मागणी असल्याचे बोलले जाते. या शिबिरांमधून पूणपणे खेळ शिकता येत नसला तरी त्याची गोडी मात्र लागते. त्यामुळे खेळाकडे वळण्यासाठी सर्वात पहिले पाऊल हे उन्हाळी प्रशिक्षण शिबीरच असते. या शिबिरांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी नक्की काय बघाल, यासाठी हा एक प्रयत्न.
भारतामध्ये क्रिकेट हा धर्म वैगेरे समजला जातो. त्यामुळे क्रिकेटची मागणी कधीच कमी होऊ शकत नाही. त्यामुळे माझा मुलगाही आंतरराष्ट्रीय दर्जावर चमकावी, तो सचिन तेंडुलकर, धोनी, कोहली व्हावा, अशी पालकांची स्वप्ने असतात. ते नाही तर किमान आयपीएलमध्ये तरी चमकावा असे वाटत असते. त्यामुळे सध्या क्रिकेट शिबिरांची चांगलीच चलती आहे. प्रत्येत विभागातील मैदानांमध्ये क्रिकेट शिबिरांचे पेव फुटलेले तुम्हाला दिसत असेलच, पण चांगले प्रशिक्षण कुठे मिळेल, याची माहिती पालकांनी काढायला हवी.
काही जण या क्रिकेट शिबिरांच्या नावाखाली धंदा करतात. गोड बोलून किंवा मी कोणत्या दिग्गज क्रिकेटपटूबरोबर खेळलोय, हे सांगून ते मुलांबरोबर पालकांनाही भुरळ पाडतात. यामध्ये पालकांचा पैसा फुकट जातो, कारण मुलांच्या गाठीशी काहीही पडत नाही. त्यामुळे पालकांनी सजग होण्याची अधिक गरज असते. दुसरीकडे काही प्रशिक्षक पैशाचा हव्यास न धरता मुलांना शिकवण्यामध्ये, त्यांना घडवण्यामध्येच धन्यता मानतात. पैशांपेक्षा ते गुणवत्तेला प्राधान्य देतात. त्यामुळे आपल्या मुलांना आपण कोणत्या शिबिरामध्ये प्रवेश घेऊन देतोय, हे पडताळून पाहायला हवे. पालकांची जबाबदारी फक्त शिबिरांनी प्रवेश मिळवून देण्याने संपत नाही, तर त्यांना शिबिरामध्ये नेमके काय शिकवले जाते, कसे शिकवले जाते, याकडेही त्यांनी लक्ष द्यायला हवे.
क्रिकेट शिबीर कसे निवडाल
* शिबीर किती कालावधीचे आहे आणि किती शुल्क आकारले जात आहे.
* शिबिरामध्ये नेमके कोणते प्रशिक्षक शिकवणार आहेत
* एखाद्या मोठय़ा क्रिकेटपटूच्या नावावर शिबीर भरवले जात असले तरी तो खेळाडू किती वेळ शिबिराला देणार आहे, हे पाहावे.
* शिबिराचा नेमका अभ्यासक्रम काय आहे, हे समजून घ्यावे.
* तुमच्या मुलाकडे वैयक्तिक लक्ष दिले जात आहे का
* शिबिरामध्ये मुलाला किती वेळ खेळायला मिळते
* प्रशिक्षकाने या क्षेत्रात किती नाव कमावले आहे
* प्रशिक्षकाने किती खेळाडू घडवले आहेत
* प्रशिक्षकांच्या आमिषांना बळी पडू नये.
* प्रशिक्षकांचे खेळाडूवर किती लक्ष आहे.
* क्रिकेटचे तंत्र मुलांना कसे शिकवले जाते.
* प्रशिक्षक मुलांना काय आणि कसे समजावून सांगतात.
सध्या क्रिकेट शिबिरांच्या मागे पालक वेडय़ासारखी धाव घेताना दिसतात. पण पालकांनी योग्य प्रशिक्षकाकडे मुलाला पाठवायला हवे. फक्त सुट्टय़ांमध्ये शिबिराला पाठवायचे म्हणून त्याला पाठवू नये, तर त्याच्यामधील गुणवत्तेला वाव द्यायला पाठवावे. सध्याच्या घडीला खोऱ्याने प्रशिक्षक उन्हाळी शिबीर आयोजित करत असतात, पण त्यांच्यामुळे आपला मुलगा दिशाहीन होत नाही ना, हे पाहायला हवे. माझ्यासाठी मुलांकडील गुणवत्ता महत्त्वाची आहे, पैसा त्यानंतरची गोष्ट आहे. रोहित शर्मा मला असाच उन्हाळी शिबिरामध्येच दिसला होता आणि त्यानंतर त्याच्या कारकीर्दीला कलाटणी मिळाली. मुंबई क्रिकेट असोसिएशन गरजू मुलांसाठी दीड महिन्याचे शिबीर भरवत असते, ही एक चांगली गोष्ट आहे असे मला वाटते.
दिनेश लाड, क्रिकेट प्रशिक्षक
सर्वप्रथम पालकांनी मुलांना समजून घ्यायला हवं. तुमच्या मुलामध्ये गुणवत्ता आहे की नाही, हे तुम्ही तपासून पाहायला हवं. मुलांना शिबिराला फक्त वेळ घालवण्यासाठी पाठवू नये. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संकेतस्थळावर प्रशिक्षकांची माहिती आहे, त्यांच्याकडून तुम्ही शिबिरांची माहिती घेऊ शकता. शिबिरांमध्ये चार प्रकारची मुलं येतात, काही फक्त वेळ घालवण्यासाठी, काही आनंद घेण्यासाठी, तर काही खरंच गुणवत्ता आहे म्हणून येतात. जर एका शिबिरातून २ मुलं जरी चांगली मिळाली तर हजारो भावी क्रिकेटपटू आपल्याला मिळू शकतील. बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षकांचा सुळसुळाट सुरूच आहे, त्यासाठी पालकांनी सतर्क, दक्ष आणि जागरूक राहणं गरजेचं आहे. पालक सतर्क राहिले आणि त्यांच्या मुलामध्ये गुणवत्ता असेल तर एक चांगला क्रिकेटपटू घडू शकतो.
– सुलक्षण कुलकर्णी, मुंबईचे माजी प्रशिक्षक
संकलन : प्रसाद लाड