आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानवर २३ धावांनी मात करत, वेस्ट इंडिजने विश्वचषक स्पर्धेचा समारोप गोड केला आहे. ३१२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ २८८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. अफगाणिस्तानकडून यष्टीरक्षक इक्रम अलीने ८६ तर रेहमत शाहने ६२ धावांची खेळी करत चांगली झुंज दिली. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने ४, केमार रोचने ३ तर ख्रिस गेल आणि थॉमसने प्रत्येकी १-१ बळी घेतला. अफगाणिस्तानचा एक फलंदाज धावबाद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेरच्या सामन्यातही अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार गुलबदीन नैब स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर रेहमत शाह आणि इक्रम अलीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानावर स्थिरावल्यानंतर, विंडीजच्या गोलंदाजांचा ताप वाढवणार असं वाटत असतानाच रेहमत शाह ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर नजीबउल्ला झरदान आणि असगर अफगाण यांनी फटकेबाजी करत धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्नही तोकडेच पडले. दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर अफगाणिस्तानच्या डावाला गळती लागली.

त्याआधी, आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने ३११ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ख्रिस गेल माघारी परतल्यानंतर नंतरच्या सर्व फलंदाजांनी अफगाणी गोलंदाजांचा समाचार घेतला. एविन लुईस, शाई होप आणि निकोलस पूरन यांनी वेस्ट इंडिजकडून अर्धशतकं झळकावली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या विंडीजची सुरुवात खराब झाली. दौलत झरदानने ख्रिस गेलला ७ धावांवर माघारी धाडलं. यानंतर विंडीजच्या सर्व फलंदाजांनी खेळपट्टीवर तग धरत मोठी धावसंख्या उभारली. एविन लुईस, शाई होप, शेमरॉन हेटमायर, निकोसल पूरन आणि कर्णधार जेसन होल्डर यांनी फटकेबाजी करत विंडीजला ३११ धावांचा टप्पा गाठून दिला. शाई होपने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून दौलत झरदानने २ तर सय्यद शिरझाद, मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. विंडीजचा एक खेळाडू धावबाद झाला.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket world cup 2019 west indies vs afghanistan leeds psd
First published on: 04-07-2019 at 19:01 IST