देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका भारतातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयसह सर्व क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल याची शाश्वती नाही. बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आशिया चषकाऐवजी आयपीएल स्पर्धा खेळवता येईल का या प्रयत्नात आहे. तर काही अधिकाऱ्यांच्या मतानुसार यंदाचा हंगाम रद्द होऊ शकतो. मात्र भारताचा तरुण गोलंदाज नवदीप सैनीच्या मते, सध्याच्या घडीला आयपीएल किंवा कोणत्याही क्रिकेटपेक्षा माणसांचा जीव वाचवणं हे अधिक महत्वाचं आहे.

अवश्य वाचा – आयपीएलच्या समर्थनासाठी माजी खेळाडू मैदानात, म्हणाले…

“आयपीएल ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे यंदा ही स्पर्धा रद्द झाली तर साहजिक दुःख होणारच. मात्र सध्या आपण ज्या परिस्थितीत आहोत ते पाहता लोकांचं आरोग्य हे अधिक महत्वाचं आहे. क्रिकेटपटू होण्याआधी आम्ही सर्वजण माणूस आहोत. त्यामुळे माणसं जगली तरच क्रिकेट खेळण्याचा अर्थ आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला क्रिकेट खेळवलं जात नाहीये हा फार मोठा मुद्दा नाही.” नवदीप हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – सध्या लोकांचा जीव महत्वाचा, आयपीएल नंतर खेळवलं जाऊ शकतं – सुरेश रैना

सध्या लॉकडाऊनच्या काळात नवदीप आपल्या घरी आहे. मात्र या काळातही त्याचा सराव सुरुच आहे. टेनिस बॉलच्या सहाय्याने तो गोलंदाजी करतोय. याचसोबत परिवारासोबत वेळ घालवण्याकडेही त्याने प्राधान्य दिलं आहे. “सध्या आपण लॉकडाऊन आहोत, तुरुंगात नाही…आपल्या सर्वांना आपल्या घरातल्यांसोबत, आई-वडिलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळतेय आणि याकडे आपण सकारात्मकरित्या पहायला हवं.” नवदीप आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या RCB संघाचं प्रतिनिधीत्व करतो.

अवश्य पाहा – IPL 2020 : स्पर्धा रद्द झाल्यास ‘या’ खेळाडूंचं स्थान धोक्यात