२२ जून रोजी सकाळी अफगाणिस्तानातील अनेक भागांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला. ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे अंदाजे एक हजार जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे दीड हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. भुकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की अफगाणिस्तान सोबत पाकिस्तान आणि भारतातील काही भागांनाही हा धक्का जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन दशकांतील अफगाणिस्तानमध्ये आलेला हा सर्वात विनाशकारी भूकंप आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरक्षा दलांकडून बचाव कार्य राबवण्यात येत आहे. या मदतकार्याला हातभार लावण्यासाठी अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान पुढे आला आहे. त्याने सोशल मीडियावर जगभरातील लोकांना मदतीसाठी आवाहन केले आहे.

अफगाणिस्तानील अनेक अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्यावेळी राशिद खानेने तेथील नागरिकांना मदत केली आहे. आतादेखील त्याने आपल्या ‘राशिद खान फाउंडेशन’च्या सहाय्याने भूकंपग्रस्तांसाठी मदत जमा करण्यास सुरुवात केली आहे. या भूकंपात सर्वस्व गमावलेल्या एका निरागस मुलीचा फोटो राशिद खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “ही छोटी मुलगी तिच्या कुटुंबातील एकमेव जिवंत सदस्य आहे. भूकंपानंतर या मुलीच्या कुटुंबातील एकही सदस्य सापडला नाही. भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली असून दुर्गम भागात अजूनही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. अशा परिस्थितीत मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, शक्य ती मदत करा.”

अफगाणिस्तानात बुधवारी आलेला भूकंप हा दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली भूकंप होता. शेजारील देश पाकिस्तानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पक्तिका प्रांतातील खोस्त शहराच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे ५० किमी अंतरावर होता. हा भाग डोंगळाल असल्याचे येथे मदत कार्यात अडथळे येत आहे. त्यामुळे राशिद खानने स्वत: पुढाकार घेत आपल्या आंतरराष्ट्रीय मित्रांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्याने एक व्हिडिओ संदेशही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

भूकंपग्रस्तांसाठी स्थानिक तालिबान सरकारने १ अब्ज अफगाणी रुपयांची (८७.५३ कोटी रुपये) मदत जाहीर केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून शोक व्यक्त करत अफगाणिस्तानला मानवतावादी मदत देऊ केली आहे.