रिअल आणि अ‍ॅटलेटिको या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील लढतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोने विक्रमी हॅट्ट्रिक नोंदवताना रिअल माद्रिदला ३-० असा विजय मिळवून दिला. या विजयासह रिअलने ला लिगा फुटबॉल गुणतालिकेत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. रिअलने ला लिगा स्पध्रेत तीन वर्षांनंतर अ‍ॅटलेटिकोला नमवण्याची किमया केली. रोनाल्डोने (१८) या कामगिरीची नोंद करताना सर्वाधिक हॅट्ट्रिक नावावर असलेल्या रिअलच्या अल्फ्रेडो डी स्टीफानो (१७) यांचा विक्रम मोडला.

रिअलच्या खात्यात १२ सामन्यानंतर ३० गुण झाले असून दुसऱ्या स्थानावर असलेला बार्सिलोना क्लब चार गुणांनी पिछाडीवर आहे. लिओनेल मेस्सी व लुईस सुआरेझ यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाला शनिवारी मध्यरात्री मलगा क्लबने गोलशून्य बरोबरीत रोखण्याची किमया केली. पोर्तुगालच्या रोनाल्डोने २३व्या मिनिटाला फ्री किकवर रिअलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ७१व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकवर आणि ७७व्या मिनिटाला गॅरथ बेलच्या पासवर गोल करत रोनाल्डोने हॅट्ट्रिक पूर्ण केली. ‘आम्ही बलाढय़ प्रतिस्पध्र्याविरुद्ध सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. काही मोजक्याच संघांना येथे अ‍ॅटलेटिकोवर ३-० असा विजय मिळवता आला आहे,’ असे मत रिअलचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी व्यक्त केले.

गेल्या चार सामन्यांतील तिसऱ्या पराभवामुळे अ‍ॅटलेटिकोची जेतेपद पटकावण्याची महत्त्वाकांक्षा टांगणीला लागली आहे. डिएगो सिमॉन्सच्या हा संघ रिअलहून ९ गुणांच्या पिछाडीवर असून त्यांची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. ‘पहिल्या सत्रात रिअलने आमच्यापेक्षा सरस खेळ केला. दुसऱ्या सत्रातील पहिल्या २० मिनिटांत आम्ही गोल करण्याची संधी निर्माण केली, रिअलच्या मध्यंतरापर्यंत खेळ केला आणि सामन्यावर पकड घेतली. मात्र, त्यानंतर सामना वाऱ्यासारखा आमच्या हातून निसटला,’ असे मत डिएगो यांनी व्यक्त केले.