‘‘हे वर्ष माझ्यासाठी स्वप्नवत आहे. राष्ट्रीय संघासाठी युरो व क्लबसाठी चॅम्पियन्स लीगचे जेतेपद आणि त्यात बलॉन डीओर पुरस्कार, यापेक्षा अधिक आनंद यापूर्वी कधीच झाला नाही,’’ हे मत बलॉन डीओर पुरस्कार मिळाल्यानंतर पोर्तुगालचा प्रमुख फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने व्यक्त केले.

२००९ ते २०१२ या कालावधीत बलॉन डी’ओर पुरस्कारावर लिओनेल मेस्सी हेच नाव कायम राहिले. हा रोनाल्डोपर्वाचा अंत तर नाही ना, अशा चर्चाना उधाणही आले. मात्र या चार वर्षांच्या काळात रोनाल्डो कट्टर प्रतिस्पर्धी मेस्सीला कडवी झुंज देत होता. त्यामुळे बलॉन डी’ओरच्या शर्यतीत मेस्सी आणि रोनाल्डो हीच नावे चर्चेत राहिली. यंदा रोनाल्डोने बाजी मारून कारकीर्दीतील चौथ्या आणि मागील चार वर्षांतील तिसऱ्या बलॉन डी’ओर पुरस्कारावर नाव कोरले. पण हे वर्ष रोनाल्डोसाठी अविस्मरणीय होतेच, या पुरस्काराने त्यात भर घातली. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेपाठोपाठ युरो चषकही रोनाल्डोने आपल्या खात्यात जमा केला. यातील युरो चषक हा त्याच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. २००४ साली पोर्तुगालला युरो स्पध्रेच्या उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. त्या वेळी संघाचा सदस्य असलेला १९ वर्षीय रोनाल्डो ढसाढसा रडला होता. २००४ पासून युरो चषक उंचावण्याचे त्याने पाहिलेले स्वप्न २०१६ साली प्रत्यक्षात उतरले आणि तेव्हाही भावनिकपणे रडणाऱ्या रोनाल्डोला जगाने पाहिले. या रडण्यात फरक हा जय-पराजयाचा होता. २०१६च्या फ्रान्समध्ये झालेल्या युरो स्पध्रेतील अंतिम फेरीत रोनाल्डोला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले होते, तरीही प्रथमोपचार घेत रोनाल्डो मैदानात परतला आणि प्रशिक्षकाची भूमिका वटवत संघाला ऐतिहासिक जेतेपद पटकावून देण्यात सहकार्य केले.

टीकाकारांना रोनाल्डो हो स्वकेंद्रित वाटतो. तसे असेलही, परंतु संघाला किंवा क्लबला जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा रोनाल्डोने एकहाती सामन्याचे चित्र पालटलेले अनेकदा पाहायला मिळाले. त्याचे हे स्वकेंद्रित वागणे संघाच्या फायद्याचेच आहे. इतरांवर अधिक अवलंबून न राहता आपल्या क्षमतेपेक्षा दुप्पट संघाला देणे, हे त्याचे साधेसरळ तंत्र. त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघातील सर्व खेळाडूंना एकटय़ाने चकवण्याची उपजत किमया त्याच्यात आहे. त्याने स्वत:चे एक विश्व निर्माण केले आहे. वयाच्या ३२व्या वर्षीही तो अगदी सहजतेने संपूर्ण मैदान आपल्या कवेत घेतो, हे उदयोन्मुख खेळाडूंसाठी शिकण्यासारखे आहे. २०१६च्या हंगामात मेस्सीपेक्षा रोनाल्डोची गोलसंख्या कमी असेल, परंतु गोलसंख्येपेक्षा संघाच्या विजयासाठी तो किती फायदेशीर ठरला, हे महत्त्वाचे. वयाची तिशी ओलांडल्यानंतर फुटबॉलपटूंना आपल्या भविष्याची चिंता लागते, परंतु रोनाल्डो ४०व्या वर्षांपर्यंत याच चपळतेने खेळू शकतो, असा दावा रिअल माद्रिद क्लबकडून केला जात आहे. म्हणूनच त्यांनी नुकताच रोनाल्डोच्या करारात २०२१ पर्यंत वाढ केली. मँचेस्टर युनायटेडसह इतर क्लबही दुप्पट किंमत देऊन त्याला करारबद्ध करण्यासाठी प्रयत्नशील होते. बलॉन डी’ओर पुरस्कारापेक्षा रोनाल्डोने कारकीर्दीत बरेच काही मिळवले आहे. क्लब कारकीर्दीत ५०० गोल, पोर्तुगालसाठी सर्वाधिक ६८ गोल, सलग नऊ वेळा युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या वर्षांतील सर्वोत्तम संघात स्थान, रिअल माद्रिदसाठी ३७७ गोल, ही न संपणारी यादी अशीच पुढे सरकत राहील.

बलॉन डीओर पुरस्कारानंतर रोनाल्डोने हे स्वप्नवत वर्ष असल्याचे नमूद केले, परंतु आकडेवारीनुसार यात तथ्य आहे का? रोनाल्डोच्या कारकीर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप..

  • २००८ मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना रोनाल्डोने गोलसपाटा लावला. युवा आणि वरिष्ठ पीएफए व एफडब्लूए या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारांसोबत त्याने पहिला गोल्डन बुटाचा पुरस्कारही पटकावला. त्याने पहिल्यांदा बलॉन डी’ओर आणि फिफाच्या सर्वोत्तम पुरस्काराचा मान मिळवला.
  • २००९ रिअल माद्रिदसोबत करार होण्यापूर्वी रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमिअर लीगचे सलग तिसरे जेतेपद पटकावून दिले.
  • २०११ त्याने पहिल्यांदा ६० गोल करण्याचा पराक्रम केला. तसेच पहिल्या ला लिगा स्पध्रेतील सर्वोत्तम आक्रमणपटूचा, तर दुसऱ्यांदा युरोपियन गोल्डन बूट पुरस्कार पटकावला.
  • २०१२ ला लिगा स्पध्रेचे जेतेपद.
  • २०१३ दुसऱ्या बलॉन डी’ओर पुरस्कारावर कब्जा.
  • २०१४ चॅम्पियन्स लीगचे जेतेपद. चॅम्पियन्स लीगच्या एका हंगामात सर्वाधिक १७ गोल करण्याचा विक्रम.
  • २०१५ ला लिगामधील सर्वोत्तम खेळाडूसह युरोपातील गोल्डन बूट पुरस्कार. माद्रिद क्लबकडून सर्वाधिक ३२३ गोल (७४१ सामने) करणाऱ्या रॉल यांचा विक्रम मोडला. रोनाल्डोने ३१० सामन्यांत ३२४ गोल्स केले.
  • ५०० क्लब गोल ( ३७७ रिअल माद्रिद, ११८ मँचेस्टर युनायटेड, ५ स्पोर्टिग सी पी)
  • ३७७ गोल माद्रिद (२७० ला लिगा, ८० चॅम्पियन्स लीग, २१ कोपा डेल रे, २ यूएफा सुपर चषक, ३ स्पॅनिश सुपर कोपा, १ क्लब विश्वचषक)

untitled-19