रविवारचा दिवस चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी सुपर सण्डे ठरला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या इतिहासात नवव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला. ऋतुराज गायकवाड (७०) आणि रॉबिन उथप्पा (६३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ‘क्वालिफायर-१’ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर चार गडी आणि दोन चेंडू राखून मात केली.

अखेरच्या षटकात १३ धावांची आवश्यकता असताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (नाबाद १८) करनच्या गोलंदाजीवर तीन चौकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनी रविंद्र जाडेजा आणि ब्राव्होच्या आधी फलंदाजीला आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र धोनीने संघाला आपल्या खास शैलीमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर त्याच्या या छोट्या पण महत्वाच्या खेळीवरुन अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडाळाचे सचीव जय शाह यांचाही समावेश आहे. शाह यांनी ट्विटरवरुन धोनीच्या या खेळीचं कौतुक केलंय.

धोनीचा उल्लेख फिनीशर असा करत शाह यांनी कॅप्टन कूलचं कौतुक केलं आहे. “सामना संपवण्याची ही धोनी स्टाइल शैली म्हणजे एक कला आहे. काय सुंदर सामना झाला. जेव्हा तुम्ही धोनीला सामना अशापद्धतीने संपवताना पाहता तेव्हा अनेक आठवणी जाग्या होतात,” असं शाह यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जय शाह हे धोनीच्या चाहत्यांपैकी एक आहेत. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा टी २० संघ जाहीर करण्यात आला होता त्यावेळेस शाह यांनीच धोनीवर सोपवण्यात आलेल्या नव्या जबाबदारीची घोषणा केली होती. धोनी भारतीय संघासोबत या स्पर्धेदरम्यान मेन्टॉर म्हणून असेल असं शाह यांनी सांगितलं होतं.