अग्रस्थान भक्कम करण्याचे चेन्नईचे ध्येय!

आंद्रे रसेलच्या समावेशाविषयी साशंकता, कोलकाताला धास्ती

आंद्रे रसेलच्या समावेशाविषयी साशंकता, कोलकाताला धास्ती

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या मोसमात जवळपास सर्वच संघांना चारीमुंडय़ा चीत केले असून गुणतालिकेत नेहमीप्रमाणेच अग्रस्थान काबीज केले आहे. आता रविवारी कोलकाता नाईट रायडर्सवर दुसरा विजय मिळवून गुणतालिकेतील आपले अग्रस्थान अधिक भक्कम करण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल.

कोलकाताचा संघ आंद्रे रसेलवर अधिक अवलंबून असल्यामुळे त्यांना गेल्या दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे आंद्रे रसेलच्या समावेशाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोलकाताची बाजू कमकुवत होणार आहे. दिल्लीविरुद्ध २१ चेंडूंत ४५ धावा केल्यानंतर त्याची दुखापत उफाळून आली होती. त्यानंतर तो गोलंदाजीत आपल्या वाटय़ाची चार षटकेही टाकू शकला नव्हता. त्याचबरोबर पुरस्कार वितरण सोहळ्यातही तो दिसला नव्हता.

‘‘रसेलला दुखापतीचा त्रास होतोय, हे नक्की. तो आमच्यासाठी विशेष खेळाडू आहे. त्याच्या समावेशाविषयीचा निर्णय आम्ही सामन्याला सुरुवात होण्याआधीच घेऊ,’’ असे कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने सांगितले. रसेलने आतापर्यंत मिळवलेल्या कोलकाताच्या चार विजयांमध्ये तीन वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.

चेन्नईने सातपैकी सहा सामने जिंकून बाद फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. मात्र राजस्थानविरुद्धच्या गेल्या सामन्यात धोनी वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आला होता. मैदानावरील शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जाणारा धोनी पंचांच्या चुकीच्या निर्णयानंतर थेट मैदानावर उतरून पंचांशीच हुज्जत घालताना दिसला होता. याच वादाच्या पाश्र्वभूमीवर हा सामना होत असला तरी सर्व काही विसरून चेन्नईला आपली विजयाची गाडी रुळावरून घसरू नये, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

  • सामन्याची वेळ : दुपारी ४ वाजता
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १.

संघ

  • चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्णोई, रितूराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिचेल सान्तनेर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कुगेलेइन.
  • कोलकाता नाइट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कालरेस ब्रेथवेट, सुनील नरिन, पीयूष चावला, कुलदीप यादव, नितीश राणा, निखिल नाईक, जो डेन्ली, श्रीकांत मुंढे, संदीप वॉरियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुरने, के. सी. करिआप्पा, यारा पृथ्वीराज.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Csk vs kkr