CWG 2022 IND W vs AUS W Gold Medal Match: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिला टी २० क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा नऊ धावांनी पराभव करून सुवर्णपदक पटकावले. परिणामी, भारतीय महिला संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. असे असले तरी भारतीय खेळाडूंनी अप्रतिम खेळ करून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सुवर्ण पदकाच्या लढतीमध्ये भारतीय खेळाडूंनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाची कर्णधार बेथ मुनीचा एका हाताने झेल टिपला. तर, राधा यादवने गोलंदाजीदरम्यान अप्रतिम क्षेत्ररक्षण करून सर्वांना चकित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने राधाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

राधा यादवने ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कांगारूंची कर्णधार मेग लॅनिंगला धावबाद केले. स्टाईकवर असलेल्या बेथ मुनीने पुढे जाऊन राधा यादवच्या चेंडूवर फटका मारला. तो चेंडू थेट गोलंदाज राधापर्यंत पोहोचला. चेंडू हातात आल्यानंतर राधाने प्रचंड चपळपणा दाखवून तो चेंडू आपल्या दोन्ही पायांच्यामधून स्टंपवर फेकला. तिच्या या झटपट हालचालीमुळे नॉन स्ट्रायकर फलंदाज मेग लॅनिंग धावबाद झाली.

हेही वाचा – CWG 2022: पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’; राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवले पहिले सुवर्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेदेखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. आयसीसीने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना या अनोख्या ‘फिल्डिंग स्टाइल’चे नाव सांगण्यास सांगितले आहे. ‘राधा यादवच्या खास क्षेत्ररक्षणाचे एका शब्दात वर्णन करा?’, अशे कॅप्शन आयसीसीने दिले आहे.