सायकल हा सर्वसामान्यांच्या आयुष्याचा घटक. मात्र शालेय टप्प्यानंतर सायकलचे महत्त्व ओसरू लागते. अन्य खेळांप्रमाणेच नियमांची चौकट असलेला खेळ म्हणजे सायकलिंग. मात्र एक खेळ म्हणून भारतात सायकलिंग या खेळाला मोठी भरारी घेता आली नाही. भारतीय चाहते फक्त टीव्हीच्या माध्यमातून ‘टूर डी फ्रान्स’सारख्या सायकल शर्यतीचा आस्वाद घेताना दिसतात. प्रत्यक्षात मात्र हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपत सायकलपटू आपल्या देशात आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिल्लीत भारतीय क्रीडा प्राधिकरणाऱ्या (साइ) राष्ट्रीय सायकलिंग अकादमीचे उद्घाटन केले. या अकादमीच्या माध्यमातून सायकलिंगपटूंना सखोल मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे. दुसरीकडे लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाच्या भारतात मोजकेच वेलोड्रोम (सायकलिंगसाठीचे ट्रॅक) उपलब्ध आहेत. उपलब्ध असलेल्या वेलोड्रोमची स्थिती भकास आहे. या खेळाकडे वळू पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे, मात्र या सायकलिंगपटूंना मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यांच्यासाठी असणारे नोकरीचे पर्याय मर्यादित आहेत. त्यामुळे या खेळाच्या विकासासाठी खेळाडू, संघटना आणि सरकार यांनी सर्वागीण विचार केला तरच सायकलिंग खेळ म्हणून बहरेल, असा सूर चर्चेच्या मैदानातून व्यासपीठावर सायकलिंग क्षेत्राशी निगडीत मान्यवरांनी व्यक्त केला.

अन्य खेळांच्या तुलनेत सायकलिंग खेळाचे स्वरुप वेगळे आहे. स्पर्धात्मक सायकलिंगसाठी लागणाऱ्या सायकलची किंमत काही लाखांपर्यंत जाते. त्याच्या जोडीला चांगल्या दर्जाचे हेल्मेट परिधान करणे अनिवार्य असते. याच्या जोडीला सायकलचे सुटे भाग बाळगणे आवश्यक ठरते. वायुव्हिजन होईल आणि स्पर्धकाला निरोगी ठेवणारे टी-शर्ट्स आणि बूट गरजेचे असतात. याव्यतिरिक्त सायकलपटूंना सकस आहार, नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. एकूणच सायकलिंग खर्चिक खेळ आहे. हा खर्च परवडणारे खेळाडूच या खेळाकडे वळतात. दैनंदिन कामकाजात सायकल चालवता येणे आणि स्पर्धात्मक सायकलिंग यात  प्रचंड फरक आहे. सायकलिंग शर्यतीसाठी व्हेलोड्रोम संरचना आवश्यक असते. आपल्या देशात केवळ अकरा ठिकाणी ही सुविधा आहे. मुंबईत व्हलोड्रोम नाहीच, पुण्यात बालेवाडीत व्यवस्था आहे. परंतु या ठिकाणी गवत उगवलेले आहे. तिथे सापही आढळतात. त्यामुळे स्पर्धक सराव करू शकत नाहीत. सायकलिंग स्पर्धाना स्पर्धकांचा आणि प्रायोजकांचा समाधानकारक पाठिंबा असतो. मात्र सायकलपटूंना ठोस रकमेची हमी देणाऱ्या नोकऱ्यांची उपलब्धता नसल्याने अडचणी वाढतात. मुंबईत हा खेळ रुजवण्यात, लोकप्रिय करण्यात पारसी समाजाचा मोठा वाटा आहे. परंतु आता तेही प्रमाण घटताना दिसत आहे.
गजेन गानला , वरिष्ठ उपाध्यक्ष, भारतीय सायकिलग महासंघ

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

सायकलिंगची लोकप्रियता वाढली आहे. आमच्या वेळी २० हजारची सायकल असणारा खेळाडू खूप श्रीमंत मानला जात असे. आता खेळाडूंना दोन-तीन लाख रुपयांच्या सायकली घेऊन स्पर्धा करण्याची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक उंचावण्याची जबाबदारी केवळ खेळाडू नव्हे तर संघटक, मार्गदर्शक, खेळाडूंचे पालक, शासन आदी सर्वाचीच आहे. भारतात राष्ट्रीय स्तरावरील सायकल शर्यतींचे प्रमाण कमी झाले आहे. अनेक वेळा शर्यती जाहीर होतात, मात्र त्या शर्यती पुढे ढकलल्या जातात. वेळेवर शर्यती आयोजित केल्या गेल्या तर खेळाडू व प्रशिक्षक यांनाही सराव व अन्य शर्यतींमधील सहभाग याचे योग्य रीतीने नियोजन करता येते. कोलंबिया, सिंगापूर आदी देशांमधील खेळाडू युरोपातील शर्यतींमध्ये भाग घेतात. तेथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्लबमध्ये प्रशिक्षण घेतात. भारतीय खेळांडूंना परदेशातील स्पर्धा व सरावाची संधी मिळाली तर निश्चितपणे भारतीय खेळाडूंचा दर्जा उंचावेल. मात्र अशा संधी मिळाल्यानंतर खेळाडूंनी आपल्या क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. खेळाडूची निवड करताना त्याची सध्याची कामगिरी व शारीरिक तंदुरुस्ती हे निकष ठेवायला हवेत.
अशोक कॅप्टन, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू

आपल्या देशात आता राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षकांची संख्या वाढली आहे. मात्र सायकलिंग प्रशिक्षकाचे काम करताना त्याकडे नोकरी म्हणूनच ते पाहत असतात. खेळाडू घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तळमळीचा अभाव अनेक प्रशिक्षकांमध्ये दिसून येतो. प्रशिक्षकाचे काम औपचारिकपणे न करता आपण या खेळाडूंचे पालक आहोत, याच भावनेने केले पाहिजे. खेळाडू वेळेवर झोप व विश्रांती घेतात की नाही, त्यांचा अभ्यास व आहार योग्य रीतीने सुरू आहे की नाही, खेळाडूंच्या समस्या काय आहेत, याचाही बारकाईने अभ्यास करण्याची जबाबदारी प्रशिक्षकाने पार पाडण्याची आवश्यकता आहे. क्रीडा प्रबोधिनीत किंवा सराव शिबिरात आलेल्या खेळाडूंपुढे या खेळाडूंच्या घरी असलेल्या समस्यांचा पाढाच वाचला जातो. त्याचा अनिष्ट परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर होतो. सायकलिंग वेलोड्रोम अनेक ठिकाणी झाले आहेत. मात्र त्याच्या योग्य देखभालीअभावी त्यावर सराव करता येत नाही. साहजिकच खेळाडूंना रस्त्यांवरच सराव करावा लागतो. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये आपल्या देशात ३० ते ४० खेळाडू व प्रशिक्षकांना अशा अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे, ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे.
कमलाकर झेंडे, ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक