काशिलिंग आडकेऐवजी इराणच्या मेराज शेखच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दबंग दिल्लीने घरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सला ३३-१५ असे नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली. भेदक चढाया आणि अफलातून डावपेच रचणारा मेराजच दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अन्य लढतीत प्रत्येक सामन्यागणिक कामगिरीत सुधारणा करणाऱ्या पुणेरी पलटण संघाने प्रो कबड्डी लीगमध्ये बंगालवर ३८-३१ मात करत बाद फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.

घरच्या मैदानावर झंझावाती प्रदर्शन करणाऱ्या पाटण्याविरुद्ध दबंग दिल्ली संघाने सर्वागीण खेळ करत मध्यंतराला ११-७ अशी आघाडी मिळवली. दिल्लीने पाटण्यावर लोण चढवताना १७-८ आगेकूच केली. अवघ्या सहा मिनिटांत दुसरा लोण चढवत त्यांनी २६-९ अशी भक्कम आघाडी घेतली. ही आघाडी सातत्याने वाढवत दिल्लीने दिमाखदार विजय साकारला. मेराज शेखने ६ तर पकडपटू सचिन शिंगाडेने ४ गुण मिळवले.

स्पर्धेत आतापर्यंत सर्वसाधारण खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या बंगालने पुण्याला टक्कर देत ४-४ बरोबरी केली. मात्र यानंतर पुण्याने सातत्याने गुण मिळवत आगेकूच केली. दीपक हुडाच्या यशस्वी चढाईसह पुण्याने बंगालवर लोण चढवत १०-५ अशी आघाडी घेतली. चढाया आणि पकडी दोन्ही आघाडय़ांवर घोटीव खेळ करणाऱ्या पुण्याने मध्यंतराला २२-१० अशी मजबूत आघाडी मिळवली. विश्रांतीनंतर बंगालने खेळ सुधारत पिछाडी भरून काढली. मात्र पुण्याच्या भेदक चढायांसमोर ते निरुत्तर ठरले. बंगालच्या नितीन मदनेच्या तडाखेबंद चढायांच्या बळावर बंगालने बलाढय़ पुण्यावर लोण चढवत ३०-३८ अशी वाटचाल केली. नितीनला पकडपटूंची अपेक्षित साथ न लाभल्याने बंगालच्या वाटय़ाला आणखी एक पराभव आला. मनजीत चिल्लरने ११ गुणांसह पुण्याच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सोनू नरवालने ७ तर दीपक निवासने ५ गुणांची कमाई करत मनजीतला उत्तम साथ दिली.

आजचे सामने

  • दबंग दिल्ली वि. तेलुगू टायटन्स
  • पाटणा पायरेट्स वि. जयपूर पिंक पँथर्स
  • वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.