महिला रिकव्‍‌र्ह प्रकारात ६८६ गुणांची कमाई; इतर खेळाडूंची निराशाजनक कामगिरी
भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीने शांघाय येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पध्रेतील रिकव्‍‌र्ह प्रकारात जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. राष्ट्रकुल स्पध्रेत दोन सुवर्णपदके नावावर केलेल्या दीपिकाने ७२ प्रयत्नांत ६८६ गुणांची कमाई करून लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कि बो बाईच्या (कोरिया) जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. २०१५मध्ये गुवांगझाऊ येथे झालेल्या पात्रता फेरीत बाईने कोरियाच्याच पार्क संग-ह्युनने (६८२) ११ वर्षांपूर्वी नोंदवलेला विक्रम मोडला होता. बाईने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
बुधवारी दीपिकाने मध्यंतरापर्यंत ३४६ गुणांची कमाई केली होती आणि जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी तिला दुसऱ्या सत्रात ३४१ गुणांचीच आवश्यकता होती, परंतु दोन प्रयत्नांत नऊ गुणांवर समाधान मानावे लागल्याने तिला बरोबरीवरच समाधान मानावे लागले. या कामगिरीमुळे दीपिका थेट तिसऱ्या फेरीत खेळणार असून भारताच्या लक्ष्मीराणी माझी (४५)आणि रिमिल बुरीयुली (७५) यांना पहिल्या फेरीपासून सुरुवात करावी लागणार आहे. सांघिक प्रकारात भारतीय महिलांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दीपिकाने मिश्र गटातही उल्लेखनीय कामगिरी केली. तिने अतानू दाससह खेळताना टर्कीवर ५-३ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत या जोडीला चौथ्या मानांकित चायनीस तैपेईकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला. कांस्यदकाच्या लढतीत भारतीय जोडीसमोर कोरियाचे आव्हान आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत अमेरिकेने ६-० अशा फरकाने कोरियाचा पराभव केला. पुरुषांच्या रिकव्‍‌र्ह पात्रता फेरीत अतानू दास, जयंत तालुकदार आणि मंगल सिंग चाम्पिया यांनी अव्वल वीस जणांमध्ये स्थान पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika kumari equals world record at archery world cup
First published on: 28-04-2016 at 02:37 IST