Deepti Sharma Record: भारतीय महिला संघाने वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवून इतिहासाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २९९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाकडून दीप्ती शर्माने दमदार गोलंदाजी केली. तिने दक्षिण आफ्रिकेच्या ५ फलंदाजांना माघारी धाडलं. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव २४६ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ५२ धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी
भारतीय संघ पहिल्या डावात अडचणीत असताना दीप्तीने ५८ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ३ चौकार आणि १ षटकार मारला. भारतीय संघाचं ३०० धावा गाठणं कठीण झालं होतं. पण दीप्तीने रिचा घोषसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या २९८ धावांपर्यंत पोहोचवली. फलंदाजीच धमाल केल्यानंतर गोलंदाजीतही तिचा बोलबाला पाहायला मिळाला. गोलंदाजी करताना तिने ९.३ षटकात ५ गडी बाद केले. तिला साथ देत शफाली वर्माने लागोपाठ २ षटकातील पहिल्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या २ फलंदाजांना माघारी धाडलं.
दीप्ती शर्माची विश्वविक्रमाला गवसणी
दीप्ती शर्माने आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील नॉकआऊट फेरीत अर्धशतक आणि गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले. यासह ती आयसीसीच्या स्पर्धेतील नॉकआऊट फेरीतील सामन्यात अर्धशतक झळकावणारी आणि ५ गडी बाद करणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे. याआधी कुठल्याही महिला आणि पुरुष क्रिकेटपटूला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील नॉकआऊट फेरीतील सामन्यात अर्धशतक आणि ५ गडी बाद करता आलेला नाही.
दीप्ती शर्माला महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ९ सामने खेळण्याची संधी मिळाली.यादरम्यान फलंदाजी करताना तिने २१५ धावा केल्या. तिने ३ अर्धशतकं झळकावली. तर गोलंदाजी करताना तिने २२ गडी बाद केले. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात तिने मोलाची भूमिका बजावली. या खेळीच्या बळावर तिची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली.
