आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या मोसमातही त्यांना पहिला सामना गमवावा लागला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात या दोन्ही संघांना पहिल्या-वहिल्या विजयाची आशा असेल.
दिल्लीला पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती आणि तेच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण होते. आतापर्यंत दिल्लीचा संघ कधीच आयपीएलमध्ये आश्वासक वाटला नाही. पण वेगवान गोलंदाज झहीर खानचे कर्णधारपद व राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभल्यामुळे संघाची कामगिरी सुधारण्याची आशा आहे. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सलग चार षटकार खेचणाऱ्या कालरेस ब्रेथवेटवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या असतील.
दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरकडे पंजाबच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, पण त्याच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळालेली नाही. मुरली विजय, मनन व्होरा यांनी पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. ग्लेन मॅक्सवेललाही पहिल्या सामन्यात आपली छाप पाडता आली नव्हती.
संघ
किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), कायले अॅबॉट, मुरली विजय, मनन व्होरा, मिचेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरीत सिंग, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्कस स्टॉयनिस, स्वप्निल सिंग, अरमान जाफर, फरहान बेहरादिन, के. सी. करिअप्पा, रिशी धवन, गुरकिराट सिंग मान, निखिल नाईक, शार्दूल ठाकूर.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), क्विंटन डी’कॉक, जे. पी. डय़ुमिनी, मयंक अगरवाल, श्रेयस अय्यर, कालरेस ब्रेथवेट, करुण नायर, पवन नेगी, रिषभ पंत, संजू सॅमसन, पवन सुयल, जयंत यादव, ख्रिस मॉरिस, सॅम बिलिंग्स, नॅथन कल्टर-नील, इम्रान ताहिर, महिपाल लोमोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, शाहबाझ नदीम, खलील अहमद, अखिल हेरवाडकर, प्रत्युष सिंग.
वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून.
प्रक्षेपण : सोनी सिक्स व सेट मॅक्सवर.