चीनच्या ली झेरुईकडून पराभूत
प्रथमच डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सायना नेहवालसह अन्य खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे सिंधूवर भारताच्या आशा अवलंबून होत्या. तिनेही सातत्यपूर्ण खेळ केला; परंतु अंतिम फेरीत चीनच्या ली झेरुईसमोर तिचा टिकाव लागला नाही. अवघ्या ४७ मिनिटांत झेरुईने २१-१९, २१-१२ असा विजय साजरा करून जेतेपद पटकावले.
जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या आणि चौथ्या मानांकित झेरुईने पहिल्या गेमपासून सिंधूवर आक्रमणांचा पाऊस पाडला. जोरदार स्मॅश आणि जाळीजवळ खेळ करत झेरुईने एक-एक गुणाची आघाडी घेतली. सिंधूनेही सलग आठ गुणांची कमाई करून चिनी खेळाडूला सडेतोड उत्तर दिले. प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर झेरुईने पहिला गेम २१-१९ असा जिंकून १-०ने आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंकडून चुरशीचा खेळ झाला. झेरुईने भेदक स्मॅश मारून सिंधूला हतबल केले. त्याचा फायदा घेत झेरुईने सलग ५ गुणांची कमाई करीत हाही गेम जिंकून जेतेपदाला गवसणी घातली. या दोघीही आतापर्यंत पाच वेळा एकमेकांविरुद्ध खेळल्या असून झेरुईने तीन सामन्यांत बाजी मारली आहे.
मिश्र दुहेरीत कोरियाच्या को सूंग ह्यूंग व किम हा ना या जोडीने ०-१ अशा पिछाडीवरून इंडोनेशियाच्या तोंतोवी अहमद व लिलियान नात्सीर यांच्यावर २०-२२, २१-१८, २१-९ असा विजय मिळवून जेतेपद पटकावले. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत ली याँग डे व यू इऑन सिआँग या कोरियाच्या जोडीने २१-८, २१-१४ अशा फरकाने लीयू चेंग व लू काई या चिनी जोडीवर सोपा विजय मिळवला.