अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी.. हे असे काही डेन्मार्कची टेनिसपटू कॅरोलिन वोझ्नियाकीला मुळीच मान्य नव्हतं. अन्यथा तिच्या सुन्या सुन्या मैफिलीत फक्त रॉरी मॅकरॉय या आंतरराष्ट्रीय गोल्फपटूचंच गीत गुंजत राहिलं असतं. प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर. रॉरी आणि कॅरोलिन यांची एकमेकांच्या सामन्यांना असलेली हजेरी सर्वाचं लक्ष वेधायची तेव्हा. त्याच काळात कारकीर्दीमधील अपयश तिला सोसावं लागलं. तरीही प्रेमाचा स्वच्छंद आनंद लुटणाऱ्या कॅरोलिननं त्याची तमा बाळगली नाही. तीन वर्षे त्यांची ही प्रेमकहाणी छान सुरू होती. पण..

१ जानेवारी २०१४ या दिवशी कॅरोलिननं अतिशय खुशीत ‘ट्विटर’वरून रॉरीसोबत साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं. मात्र तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. २१ मे रोजी रॉरीनं कॅरोलिनशी नातेसंबंध संपवल्याचे समाजमाध्यमांवर जाहीर केलं. त्यानं आपल्या संदेशात म्हटलं होतं की, ‘‘विवाह काही दिवसांवर येऊन ठेपला असताना निमंत्रणाचं कार्य अंतिम टप्प्यात आलं आहे. मात्र मी विवाहासाठी तयार नसल्याचे स्पष्ट करू इच्छितो. कॅरोलिनला भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. याचप्रमाणे तिच्यासोबत घालवलेले सुखद क्षण माझ्या सदैव स्मरणात राहतील.’’

हा मोठा धक्काच तिच्यासाठी. पण तिने तोही पचवला. ती खचली नाही. त्यातून सावरली आणि तिने पुन्हा ‘फिनिक्सभरारी’ घेतली. वयाच्या २७व्या वर्षी अनपेक्षित यश तिच्या आयुष्यात आलं. जिद्दीच्या बळावर ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचं पहिलंवहिलं ग्रँडस्लॅम तिनं जिंकलं.

कॅरोलिन ही क्रीडापटू वोझ्नियाकी दाम्पत्याची कन्या. पिओत्र व्यावसायिक फुटबॉल खेळायचा, तर अ‍ॅना पोलंडच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाचं प्रतिनिधित्व करायची. बोल्डक्लुबेन या डॅनिश फुटबॉल क्लबशी पिओत्र करारबद्ध झाल्यामुळे वोझ्नियाकी कुटुंबानं पोलंडहून डेन्मार्कला स्थलांतर केलं. मग डेन्मार्कमधील ओडेन्स येथे कॅरोलिनचा जन्म झाला. वयाच्या १४व्या वर्षी कॅरोलिननं टेनिस कारकीर्दीला प्रारंभ केला. वडिलांचं प्राथमिक मार्गदर्शन तिला लाभलं. नंतर आदिदास खेळाडू विकास कार्यक्रमांतर्गत स्वेन ग्रोईनिव्हेल्ड यांच्याकडे तिनं खेळाचे व्यावसायिक धडे गिरवले. मग रिकाडरे सांचेझ, थॉमस जोहान्सन, थॉमस हॉगस्टेड आणि मायकेल मॉर्टिनसन यांच्यासारख्या मातब्बर प्रशिक्षकांचं मार्गदर्शन तिला मिळालं.

२००५ मध्ये कॅरोलिननं कनिष्ठ गटात अनेक स्पर्धा जिंकून टेनिसजगताचं लक्ष वेधलं. यात २००६ मधील विम्बल्डनचं मुलींच्या एकेरीतील जेतेपद महत्त्वाचं ठरलं. २००८ मध्ये ऑस्टेलियन खुल्या स्पर्धेत तिनं प्रथमच भाग घेतला. गिसेला डुल्को आणि २१वी मानांकित अ‍ॅलोना बोंडारेंको यांना पराभूत करीत तिनं उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. पण चौथ्या मानांकित अ‍ॅना इव्हानोव्हिकनं तिची वाटचाल खंडित केली. त्यानंतर फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेला तिला प्रथमच तिसावं मानांकन देण्यात आलं. या वेळी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील अ‍ॅना इव्हानोव्हिकनं तिसऱ्या फेरीत तिचा पराभव केला. मग विम्बल्डनमधील तिसऱ्या फेरीत द्वितीय मानांकित एलिना यान्कोविकनं तिचं आव्हान संपुष्टात आणलं. नॉर्डिक लाइट खुल्या टेनिस स्पर्धेत जागतिक महिला टेनिसमधील पहिलं विजेतेपद तिला मिळालं. याचप्रमाणे २००९ मध्ये अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी तिनं गाठली. ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती डेन्मार्कची पहिली महिला खेळाडू ठरली. पण किम क्लिस्टर्सच्या झंझावातापुढे तिचा निभाव लागला नाही.

२०१०-११ ही दोन्ही वर्षे कॅरोलिननं गाजवली. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर विराजमान होणारी ती पहिली डॅनिश महिला ठरली. या दोन वर्षांत तिनं सहा स्पर्धा जिंकल्या. कारकीर्द ऐन बहरात असतानाही ग्रँडस्लॅम विजेतेपद मात्र तिला हुलकावणी देत होतं. याच काळात रॉरीनं तिचं हृदय जिंकलं. पण २०१२ पासून तिच्या यशाचा आलेख खालावत गेला. २०१३ मध्येही तिला झगडावं लागलं. नेमक्या याच कठीण कालखंडात रॉरीशी असलेले तीन वर्षांचे तिचे नातेसंबंधसुद्धा संपुष्टात आले. परंतु वडिलांनी तिला खंबीर आधार दिला. तिच्या मार्गदर्शनाची धुरा त्यांनी पुन्हा सांभाळली. २०१५-१६ मध्ये जागतिक क्रमवारीतील अव्वल दहा स्थानांमधून ती हद्दपार झाली. दुखापतींनीही तिचा पिच्छा पुरवला. कॅरोलिन नावाचा ‘टेनिसतारा’ आता लवकरच लुप्त होणार अशी भीती निर्माण झाली.

पण कॅरोलिनला ते नामंजूर होतं. ती पुन्हा जिद्दीनं उभी राहिली. २०१७ मध्ये तब्बल आठ आंतरराष्ट्रीय स्पर्धाची अंतिम फेरी गाठण्याची तिनं किमया साधली. यापैकी दोन स्पर्धामध्ये ती विजेती ठरली. मागील वर्षांच्या अखेरीस तिनं क्रमवारीतील तिसऱ्या स्थानावर झेप घेत टेनिसजगताला आपली दखल घ्यायला लावली. अखेरीस चालू वर्षांच्या प्रारंभीच तिचं स्वप्न पूर्ण झालं. ऑस्टेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदामुळे पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचं भाग्य तिला अनुभवायला मिळालं. आता ती पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत टेनिस क्रमवारीतील अव्वल स्थानावर विराजमान आहे.

कारकीर्दीतील कलाटणीचे क्षण अनुभवण्यापूर्वी गतवर्षी व्हॅलेंटाइन डेला कॅरोलिननं आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू डेव्हिड ली याच्याशी आपल्या प्रेमप्रकरणाविषयी समाजमाध्यमांवर ऐलान केलं. सहा फूट नऊ इंच उंचीच्या डेव्हिडशी तीनच महिन्यांपूर्वी तिचा साखरपुडाही झाला. आता टेनिसमधील व्यावसायिक यश आणि आयुष्याला पूरक ठरणारं प्रेम हे दोन्ही तिच्या आयुष्यात परतलं आहे..

प्रशांत केणी prashant.keni@expressindia.com