भारताचा अ संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरूद्ध अनऑफिशियल कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने मोठी धावसंख्या उभारली. तर प्रत्युत्तरात भारताने चांगली झुंज दिली आहे. या सामन्यात भारताकडून प्रथम ध्रुव जुरेलने शतकी खेळी केली. त्यानंतर आता देवदत्त पडिक्कलने १५० धावांची खेळी केली आहे.

कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिक्कलने भारत अ संघात पुनरागमन करताना शतक झळकावलं. शुक्रवारी लखनौमध्ये ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध त्याने आपले सातवं प्रथम श्रेणी शतक पूर्ण केलं. ८६ धावांच्या पुढे खेळत पडिक्कलने शुक्रवारी सकाळी २० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्याच्या या खेळीमुळे भारत ऑस्ट्रेलिया अ संघाच्या पहिल्या डावातील ६ बाद ५३२ धावांच्या विशाल धावसंख्येच्या जवळ पोहोचला.

या खेळीदरम्यान पडिक्कलने ३ हजार प्रथम श्रेणी धावा पूर्ण केल्या. त्याने आपल्या ७४ व्या डावात हा टप्पा गाठला. २५ वर्षीय पडिक्कल यंदा आपला दुसराच स्पर्धात्मक सामना खेळत आहे. तो आयपीएल २०२५ च्या चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता.

पडिक्कलने या महिन्याच्या सुरुवातीला बेंगळुरू येथे झालेल्या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात अर्धशतक झळकावत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं, त्यानंतर त्याची भारत अ संघात निवड झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या अनऑफिशियल कसोटीत, त्याने भारत अ संघाच्या पहिल्या डावात २८१ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५० धावा केल्या.

ध्रुव जुरेलचं ऑस्ट्रेलियाविरूद्ध महत्त्वपूर्ण शतक

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या या सामन्यात ध्रुव जुरेलची बॅटदेखील चांगलीच तळपली. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले. एका टोकाला पडिक्कल ठामपणे उभा असताना, जुरेलने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ऋषभ पंतनंतर तोच सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. पंत संघात असतानाही त्याला केवळ फलंदाज म्हणून घ्यावं, अशी मागणी याआधी अनेकदा झाली आहे.

जुरेलने या खेळीनंतर पुन्हा एकदा स्वत:साठी पुनरागमनाचा दावा ठोकला आहे. जुरेलने अप्रतिम प्रतिआक्रमण करताना ११४ चेंडूत दहा चौकार आणि चार षटकार लगावत शतकी खेळी केली. विशेष म्हणजे त्याने ऑफ-स्पिनर रोक्किच्चोलीविरूद्ध धावा करताना केवळ ४६ चेंडूत तब्बल ४७ धावा केल्या, ज्यात तीन षटकारांचा समावेश होता.