क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, टेनिस, आदी खेळ सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत. त्यात ग्रामीण भागातील खेळाडूंना नाहीच नाही. त्यामुळेच गुणवत्ता असूनही केवळ पैसा नसल्याने ग्रामीण भागातील
खेळाडू मागे राहतात. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना परवडेल असा खेळ खेळण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. केवळ २५ गुणांकरिता नव्हे, तर या खेळातून त्यांच्या नोकरीचा प्रश्नही मार्गी लागायला हवा. अशा या खेळाडूंना परवडणारा व्हॉलीबॉल हा खेळ आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. मुंबईत सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी करंडक व्हॉलीबॉल स्पध्रेत हीच मुले-मुली आपले कौशल्य दाखवत आहेत. या निमित्ताने भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे यांच्याशी खेळाचा विकास, महाराष्ट्राची प्रगती, अंतर्गत राजकारण आणि पुढील वाटचाल याबाबत केलेली बातचीत –
*या खेळातील महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत काय सांगाल?
महाराष्ट्राची प्रगती उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय स्पर्धामध्ये राज्याचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. देशात या खेळात राज्य आठव्या क्रमांकावर आहे. आता तुम्ही म्हणाल, आठवा क्रमांक आणि प्रगती कशी? राज्यातील खेळाडूंची शरीररचना या खेळासाठी पूरक नाही, खेळाडूंची उंची पुरेशी नाही, असे असूनही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुणवत्ता आहे आणि म्हणून राज्याची प्रगती उल्लेखनीय म्हणायला हरकत नाही.
*शहरी भागांच्या तुलनेत हा खेळ ग्रामीण भागांत जास्त पसरलेला दिसतोय, यामागचे कारण?
शहरी भागात क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी महागडय़ा खेळांना जास्त प्रमाणात पसंती असते. हा खेळ सर्वसामान्य खेळाडूलाही परवडणारा असल्याने तो ग्रामीण भागातील खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचा व रुजवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला. जिल्हा संघटनाही आपापली कामगिरी अचूकपणे पार पाडत असल्याने ग्रामीण भागात या खेळाचा पसारा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. शहरी भागांमध्ये संघटनांना तो पसारा वाढवण्यात यश मिळाले नाही, हेही तितकेच खरे.
*राज्य संघटनेवर गेली १२ वष्रे तुम्ही आहात. तुमची एकहाती सत्ता आहे, असा दावा तुम्ही करता, परंतु काही जिल्हे तुमच्या विरोधात आहेत का?
माझ्या विरोधात एकही जिल्हा नाही. ३६ पैकी ३६ जिल्ह्यांनी मला बिनविरोध निवडून दिले आहे. हा काही अल्पसंतुष्ट जिल्हे आहेत. इतर पदांकरिता निवड झालेल्या व्यक्तींसाठी त्यांचा विरोध आहे किंवा त्यांना पद न मिळाल्याने ते नाराज आहेत. मात्र सर्वाना पद देऊन संतुष्ट करणे शक्य नाही. पदांवरून त्यांच्यात नाराजी आहे आणि मला विश्वास आहे की ती नाराजी आम्ही दूर करू. पण पदासाठी नाराज असलेल्या या संघटना खेळाच्या विकासाच्या दृष्टीने अजून मागासलेल्याच आहेत. लवकरच आम्ही एक बैठक बोलावली आहे आणि त्यात उपसमित्यांची स्थापना करून या संघटनांमधील पदाधिकाऱ्यांना पद देण्याचा निर्णय घेण्यात येईल. जेणेकरून त्यांची नाराजी दूर होईल आणि व्हॉलीबॉलच्या प्रचारासाठी ते जोमाने काम करतील.
*पदाधिकाऱ्यांच्या विकासाचा प्रश्न तुम्ही मार्गी लावाल, परंतु खेळाच्या विकासाचे काय?
ग्रामीण भागात आमच्या स्पर्धा सुरूच असतात. राष्ट्रीय स्पध्रेच्या संघ निवडीसाठी नागपूरला शिबीर आयोजित करण्यात येते आणि कोणत्याही खेळाडूवर दुजाभाव होऊ नये, याकरिता मी जातीने तेथे हजर असतो. आता नागपूरला पाच देशांची निमंत्रित आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कझाकस्तान, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ व चीन या देशांना निमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि भारतीय व्हॉलीबॉल महासंघाकडे त्यासाठी पत्रव्यवहारही केला आहे. २०१७मध्ये ही स्पर्धा नागपूरमध्ये नक्की होईल.
*आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये या ग्रामीण खेळाडूंना सहभाग घेताना अनेक अडचणींना सामना करावा लागत असेल, त्यात या खेळाला प्रायोजकही फार कमी मिळतात, मग हे सर्व गणित कसे जमवले जाते?
होय, हे खरे आहे. गुणवत्ता असूनही अनेकदा या खेळाडूंना आर्थिक असक्षमतेमुळे आंतरराष्ट्रीय स्पध्रेत सहभाग घेताना दहा वेळा विचार करावा लागतो, परंतु या खेळाप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे या खेळाडूंचा खर्च उचलण्यासाठी राज्य संघटना कोणतीही कसर सोडत नाही. राज्य संघटनेबरोबर भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे उपाध्यक्षपदही माझ्याकडे असल्याने राज्यातील खेळाडूंच्या प्रगतीसाठी झटपट पावले उचलली जातात. व्यवस्थापक, पंच यांनाही पुढील प्रशिक्षणासाठीचा खर्च आम्ही उचलतो. तसेच आता नोकरीच्या अनेक संधी या खेळाडूंना मिळत असल्याने आर्थिक चणचण भासत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2015 रोजी प्रकाशित
ग्रामीण भागातील खेळाडूंचा विकास महत्त्वाचा
क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, टेनिस, आदी खेळ सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत. त्यात ग्रामीण भागातील खेळाडूंना नाहीच नाही.
First published on: 20-04-2015 at 02:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development essential of players comes from rural areas