नवी दिल्ली : अपंग क्रीडापटू देवेंद्र झझारियाला मंगळवारी पद्मभूषण हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. याचप्रमाणे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रासह आठ जणांना प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नीरज हा ऑलिम्पिकमधील अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात सुवर्णपदक (२०२०च्या) जिंकणारा पहिला भारतीय क्रीडापटू ठरला होता. याशिवाय नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्यानंतर वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला. याचप्रमाणे ४० वर्षीय देवेंद्रने पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये दोन सुवर्णपदक (२००४ आणि २०१६च्या) जिंकली आहेत.

२० वर्षीय नेमबाज अवनी लेखारा, बॅडिमटनपटू प्रमोद भगत आणि भालाफेकपटू सुमित अँटिल या अपंग क्रीडापटूंनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय ९३ वर्षीय मार्शल आर्टपटू शंकरनारायण मेनन चुंडेल, माजी आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट्स विजेते फैझल अली, भारताचे माजी फुटबॉल कर्णधार ब्रह्मानंद संखवालकर आणि हॉकीपटू वंदना कटारिया यांचाही पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे मी फार आनंदी आहे. तुम्हा सर्वाचा पाठिंबा आणि शुभेच्छांमुळे हे शक्य झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न नेहमीच सुरू राहतील. तसेच सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन. नीरज चोप्रा