भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून तणावाचं वातावरण होतं. भारताच्या जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यामुळे अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू काश्मीरचा भाग आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाचं वातावरण होतं. यादरम्यान भारताच्या तिन्ही दलाच्या डीजीएमओंची आज १२ मे रोजी पुन्हा पत्रकार परिषद सुरू आहे, ज्यामध्ये डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घाई यांनी विराटचा उल्लेख केला.

विराट कोहलीने आज म्हणजेच १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीचा फॅन फॉलोईंग प्रचंड मोठा आहे. सर्वांनीच विराटच्या निवृत्तीबाबत आश्चर्य व्यक्त केलं आणि वक्तव्य करत आहेत. दरम्यान विराट कोहली हा भारताच्या डिफेन्सचे मुख्य डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घाई यांचाही आवडता खेळाडू असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानने डागलेले ड्रोन, मिसाईल यांचा मारा कसा रोखला हे सांगताना क्रिकेटचं उदाहरण दिलं. पाकिस्तानच्या हवाई माऱ्याला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने कसं रोखलं याबाबत सांगताना एक डायग्राम परिषदेत दाखवली होती. ज्यावर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम किती प्रभावी आहेत आणि त्यांनी भारताच्या कोणत्याही ठिकाणांवर ते हल्ले होऊ देण्याआधीच हवेत परतवून लावले.

डीजीएमओ राजीव घाई म्हणाले, “ही डायग्राम पाहताना मला घटना आठवते. मी तुम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून हायलाईट करून सांगतो. मी जेव्हा शाळेत होतो. जवळपास ७० च्या दशकात त्यावेळेस इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात… आज क्रिकेटबद्दल पण बोललं पाहिजे, कारण मी पाहिलं की विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अनेक भारतीयांप्रमाणे तो माझाही आवडता क्रिकेटपटू आहे.”

डीजीएमओ पुढे सांगताना म्हणाले, “तर त्या ७० च्या दशकात ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये प्रसिद्ध अॅशेस मालिका सुरू होती. त्यावेळचे ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज गोलंदाज, ज्यांचे क्रिकेटच्या इतिहासात मोठं नाव आहे, ते म्हणजे जेफ थॉमसन आणि डॅनिस लिली. या दोघांनी इंग्रजी फलंदाजी फळी उद्धवस्त केली. ऑस्ट्रेलियन लोकांनी तेव्हा एक वाक्यप्रचार सुरू केला होता. From Ashes to Ashes, Dust To Dust, If Thommo Don’t Get ya, Lillee Must…. म्हणजेच अॅशेस मालिकांमध्ये जर थॉमसनने विकेट नाही घेतली तर लिली नक्कीच घेईल.”

India's Multilayered Counter Drone and Air Defence Grid Explained by DGMO Rajeev Ghai
डीजीएमओ राजीव घाई समजावत असलेली भारताची एअर डिफेन्स सिस्टीम

डीजीएमओ पुढे म्हणाले, “जर तुम्ही या डायग्राममधील लेयर पाहिलेत तर तुम्हाला कळेल मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर त्या सर्व सिस्टिम तुम्ही पार केल्यात, पण त्या ग्रीड सिस्टिममधील एक लेयर नक्कीच तो ड्रोन किंवा मिसाईल हल्ला करण्यापूर्वी हवेतच पाडेल.”

डीजीएमओ राजीव घाई यांनी भारताच्या सुरक्षेबरोबरच क्रिकेटचं उदाहरण देत विराट कोहलीचा उल्लेख केला. यादरम्यान त्यांनी विराटच्या निवृत्तीबाबत सांगत तो आपलादेखील आवडता खेळाडू असल्याचं म्हटलं.