महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून झटपट निवृत्ती घेतली आणि साऱ्यांनाच धक्का बसला. पण निवृत्तीनंतर धोनीने ड्रेसिंग रुममध्ये येऊन खेळाडूंना संवाद साधला आणि हाच संघ आठ वर्षे खेळेल, असे भाकीत वर्तवल्याचे भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने सांगितले.
‘‘धोनीने निवृत्तीनंतर आमच्याशी संवाद साधला त्या वेळी तो म्हणाला की, आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवत त्यानुसार सर्वोत्तम खेळ केल्यास हाच संघ पुढची ७-८ वर्षे कायम राहील जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या संधीचे सोने करता यायला हवे,’’ असे सहाने सांगितले.
संघाचे संचालक रवी शास्त्री आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्याकडून चांगला पाठिंबा मिळाल्याचे या वेळी साहाने सांगितले. याबाबत साहा म्हणाला की, ‘‘धोनीच्या निवृत्तीनंतर रवी शास्त्री आणि डंकन फ्लेचर यांनी मला चांगलाच पाठिंबा दिला. त्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि त्यामुळेच मला चांगली कामगिरी करता आली. त्यांनी मला एक मंत्र दिला आणि त्यानुसारच मी खेळ केला, तो मंत्र म्हणजे सकारात्मक राहा आणि खेळाच्या प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटा.’’