वृत्तसंस्था, कोलकाता
लयीत असलेल्या ध्रुव जुरेलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळणार असून यष्टिरक्षणाची धुरा ऋषभ पंत सांभाळेल, असे भारतीय संघाचा साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन दोएशहातेने बुधवारी सांगितले. जुरेलला अंतिम ११ खेळाडूंत स्थान देताना अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला संघाबाहेर बसावे लागणार असल्याचेही दोएशहाते म्हणाला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. २४ वर्षीय जुरेलबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती. मूळचा यष्टिरक्षक-फलंदाज असलेल्या जुरेलने पंतच्या अनुपस्थितीत अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत शतक साकारले होते. मात्र, आता आफ्रिकेविरुद्ध पंतचे पुनरागमन होणार असल्याने जुरेलबाबत संभ्रम निर्माण झाला होता. जुरेलने गेल्या पाच प्रथमश्रेणी सामन्यांत मिळून चार शतके केली आहेत. गेल्याच आठवड्यात त्याने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या कसोटीत दोन्ही डावांत शतकी खेळी केली होती. इतक्या उत्कृष्ट लयीत असलेल्या जुरेलकडे दुर्लक्ष करणे भारतीय संघाला अवघड जाईल, असे मत माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले होते. त्याचे हे बोल खरे ठरले.
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोएशहातेला जुरेलबाबत विचारण्यात आले. ‘‘पहिल्या कसोटीसाठी संघाची रचना कशी असणार हे आम्हाला ठाऊक आहे. जुरेल आणि पंत या दोघांनाही आम्ही वगळू शकत नाही. त्यामुळे अगदी थोडक्यात उत्तर द्यायचे तर हे दोघेही कोलकाता येथे खेळणार हे निश्चित आहे,’’ असे दोएशहाते म्हणाला.
जुरेलने गेल्या पाच प्रथमश्रेणी सामन्यांत अनुक्रमे १४०, ५६, १२५, ४४, नाबाद १३२ आणि नाबाद १२७ धावा अशी कामगिरी केली आहे. ‘‘जुरेलने गेल्या सहा महिन्यांत जशी कामगिरी केली आहे, ते पाहता त्याला संघाबाहेर ठेवणे योग्य ठरणार नाही. गेल्याच आठवड्यात त्याने ‘अ’ संघाकडून दोन्ही डावांत शतक साकारण्याची किमया साधली होती. त्यामुळे अशा खेळाडूला संधी द्यावीच लागेल,’’ असे दोएशहातेने नमूद केले.
सामना जिंकण्याच्या दृष्टीनेच निर्णय
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांनी आम्ही भविष्यात परदेशात होणाऱ्या कसोटी सामन्यांचा विचार करून नितीश रेड्डीला अष्टपैलू म्हणून तयार करत असल्याचे सांगितले होते. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध त्याला वगळण्यात आले आहे. ‘‘नितीशबाबतचा आमचा विचार बदललेला नाही. त्याच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही केवळ हा सामना जिंकण्याबाबत विचार करत आहोत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे महत्त्व लक्षात घेता आणि आम्हाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकेल, त्याचा विचार करता, आम्हाला या सामन्यापुरते नितीशला संघाबाहेर ठेवावे लागू शकेल,’’ असे दोएशहातेने स्पष्ट केले. जुरेलला कसोटी संघातून सोडण्यात आले असून तो दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध भारत ‘अ’ संघाकडून एकदिवसीय सामने खेळेल.
अष्टपैलूंमुळे संघाला बळकटी
फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंमुळे भारतीय संघाला बळकटी मिळत असल्याचे मत टेन दोएशहातेने मांडले. ‘‘वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू असले, तरी त्यांचा तुम्ही फलंदाज म्हणूनही विचार करू शकता. ते गुणवान फिरकीपटू आहेत आणि तितकेच चांगले फलंदाजही आहेत. त्यामुळे आम्हाला संघनिवड करताना प्रयोगशील निर्णय घेणे सोपे जाते,’’ असे दोएशहातेने सांगितले. ईडन गार्डन्सची खेळपट्टी तिसऱ्या दिवसापासून फिरकीला साथ देणे अपेक्षित आहे. अशात भारतीय संघ जडेजा, वॉशिंग्टन आणि अक्षर या फिरकी त्रिकुटासह खेळण्याचे संकेतच दोएशहातेने दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात केशव महाराज, सायमन हार्मर आणि सेनुरन मुथुसामी असे प्रतिभावंत फिरकीपटू आहेत. या मालिकेत हे तिघेही खेळणे अपेक्षित आहे. त्यांच्याविरुद्ध यश मिळवणे हे आमच्यासाठी निश्चितपणे आव्हान असेल. गेल्या वर्षी न्यूझीलंडने आम्हाला मायदेशात हरविले, तेव्हा त्यांच्या फिरकीपटूंनीच आमच्या फलंदाजांना अडचणीत टाकले होते. आमच्या फलंदाजांनी यातून धडा घेतला असेल अशी मला आशा आहे. – रायन टेन दोएशहाते, भारतीय संघाचा साहाय्यक प्रशिक्षक.
