Dhruv Jurel Twin Century in IND A vs SA A 2nd Unofficial Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमध्ये दुसरा अनऑफिशियल चार दिवसीय सामना खेळवला जात आहे. हा सामना बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड १ वर सुरू आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने शतकं करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ध्रुव जुरेलने दोन्ही डावांमध्ये शतकं केली आहेत.

ध्रुव जुरेलने या सामन्याच्या पहिल्या डावात १७५ चेंडूत नाबाद १३२ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. आता, दुसऱ्या डावात ध्रुव जुरेलनेही शानदार शतक झळकावलं. ध्रुव जुरेलने या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये शतकं करत संघाचा डाव उचलून धरला आणि महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

ध्रुव जुरेलने दुसऱ्या डावातही आपला चांगला फॉर्म कायम ठेवला. भारताला १०४ धावांवर ऋषभ पंतच्या रूपात मोठा धक्का बसला. दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना ऋषभ पंत दुखापतीमुळे रिटायर्ड होत मैदानाबाहेर गेला. यानंतर अचानक ध्रुव जुरेल फलंदाजीला लवकर आला. जुरेल फलंदाजीला आला तोपर्यंत भारतीय संघाने चार विकेट गमावल्या होत्या. पण, ध्रुव जुरेलने डाव सावरला आणि पुन्हा एकदा शतक केलं.

ध्रुव जुरेलने या डावात १५९ चेंडूंचा सामना करत १२ चौकारांसह आपलं शतक पूर्ण केले, ज्यामुळे भारतीय संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली. यादरम्यान त्याने हर्ष दुबेसह सहाव्या विकेटसाठी १८४ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारत सामन्यात मजबूत स्थितीत आला.

पहिल्या डावात ध्रुव जुरेलने शतक झळकावलं. भारतीय संघाने फक्त १२६ धावांवर सात विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर त्याने संघाला आपल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर २५५ धावांपर्यंत पोहोचवलं. ध्रुव जुरेल या खेळीनंतर स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिका कसोटीत संघात खेळण्याची शक्यता वाढली आहे.

ध्रुव जुरेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दोन्ही डावांमध्ये शतक करत आपला मजबूत दावा ठोकला आहे. या मालिकेत ऋषभ पंतही संघात परतणार आहे. त्यामुळे पंत हा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल. पण, तो नितीश रेड्डीसाठी मोठा धोका निर्माण करू शकतो, कारण गेल्या मालिकेत गोलंदाज म्हणून त्याचा फारसा वापर झाला नव्हता. अशा परिस्थितीत फलंदाजीचा विचार करता ध्रुव जुरेल संघाची पहिली पसंती बनू शकतो.