India vs England 5th Test: इंग्लंडचा संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा जो रूट खंबीरपणे उभा राहतो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना जो रूटने १०५ धावांची दमदार खेळी केली. भारतानं अवघ्या ६ धावांनी इंग्लंडवर चित्तथरारक विजय मिळवला. यामध्ये ज्यो रूटची शतकी खेळीनंतरची विकेट महत्त्वाची ठरली. त्याला बाद करण्यासाठी ध्रुव जुरेलने भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ओव्हलच्या मैदानावर आजवर ३५० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. त्यामुळे इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी आतापर्यंतचा सर्वात यशस्वी पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला जशी सुरूवात हवी होती, तशी बेन डकेट आणि जॅक क्रॉउले यांनी करून दिली. दोघांनी मिळून ५० धावांची दमदार सलामी दिली. क्रॉउलेने १४ आणि बेन डकेटने ५४ धावांची खेळी केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ओली पोपने २७ धावांची खेळी केली. त्यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रुकने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला.

या डावात जो रूटने १५२ चेंडूंचा सामना करत १०५ धावांची खेळी केली. जो रूट आणि हॅरी ब्रुक यांनी मिळून शतकी भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर इंग्लंडने सामन्यावर पकड मजबूत केली. सामना भारतीय संघापासून खूप दूर गेला होता. त्यानंतर शतक झळकावून हॅरी ब्रुक १११ धावांवर माघारी परतला. विजयाच्या जवळ असलेल्या इंग्लंड संघासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. ब्रुक बाद झाल्यानंतर प्रसिध कृष्णाने जेकब बेथलला त्रिफळाचित करत माघारी धाडलं.

इथून पुढे दबाव इंग्लंडवर होता. जिंकण्यासाठी ४० धावांची गरज होती. त्यावेळी प्रसिध कृष्णाने जो रूटला बाद करत माघारी धाडलं. तर झाले असे की, भारतीय संघाकडून ७३ वे षटक टाकण्यासाठी प्रसिध कृष्णा गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटचा चेंडू प्रसिधने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. या चेंडूवर त्याने कट शॉट मारून एक धाव घेण्याच्या प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हाती गेला. ध्रुव जुरेलने उजव्या बाजूला डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला. या झेलसह भारतीय संघाच्या आत्मविश्वासातही भर पडली.