वृत्तसंस्था, मुंबई : भारतीय फुटबॉलने गेल्या काही वर्षांत आपला स्तर उंचावला असला तरीही त्यांना अजूनही ऑलिम्पिकपर्यंत मजल मारता आली नाही. भारतीय फुटबॉलचा १९५१ ते १९६२ हा काळ सुवर्णकाळ संबोधला जातो. याच कालखंडात ४ सप्टेंबर १९६२ हा दिवस भारताच्या फुटबॉल इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे. याच दिवशी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आज या घटनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

सय्यद अब्दुल रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने जकार्ता येथे झालेल्या या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नाही. भारताला साखळी सामन्यात दक्षिण कोरियाने २-० असे पराभूत केले. यानंतर भारताने थायलंडला ४-१ असे नमवले. या विजयात पी.के.बॅनर्जी यांनी दोन गोल करीत निर्णायक भूमिका पार पाडली, तर चुन्नी गोस्वामी आणि तुलसीदास बलराम यांनी प्रत्येकी एक गोल केला. पुढील लढतीत भारताने जपानचा २-० असा पराभव केला. यामध्येही बॅनर्जी आणि बलराम यांनी गोल केले. या कामगिरीनंतर भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण व्हिएतनामवर ३-२ असा विजय साकारत अंतिम फेरीत स्थान मिळवले. या विजयातही गोस्वामी (दोन गोल) आणि जर्नेल सिंग (एक गोल) यांनी योगदान दिले.

अंतिम सामन्यात भारतासमोर मजबूत समजल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियाचे आव्हान होते. १९५८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाकडून १-३ अशी हार पत्करली. त्यामुळे भारताला या पराभवाचा वचपा काढण्याची संधी होती. या सामन्यात भारतासमोर दुखापतीचेही आव्हान होते, मात्र त्यावरही आपल्या खेळाडूंनी मात केली. या सामन्यात चुन्नी गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या युवा भारतीय संघाने कोरियाला २-१ असे नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. भारताकडून पी.के.बॅनर्जी (१७व्या मिनिटाला) आणि जर्नेल सिंग (२०व्या मि.) यांनी गोल केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.