India vs Pakistan, World Cup 2023: विश्वचषक २०२३मध्ये शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने विश्वचषकात पाकिस्तान आठव्यांदा चारीमुंड्या चीत केले. या मानहानीकारक पराभवानंतर, पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफचा एक भाग आणि संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी संघाच्या खराब कामगिरीनंतर पत्रकार परिषदेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांनी आयसीसी आणि बीसीसीआयवरही निशाणा साधला आहे. त्यांच्या या विधानांवर सध्या सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे. आर्थर म्हणाले की, “त्यांनी हा सामना निमित्त म्हणून वापरला असून यावर मला फारसे भाष्यं करायचे नाही, परंतु आयोजकांमुळे हा सामना बीसीसीआयच्या एखाद्या कार्यक्रमासारखा वाटला.”

काय म्हणाले पाकिस्तानचे संघ संचालक?

पाकिस्तानच्या संघ (टीम डायरेक्टर) व्यवस्थापक संचालकाने सांगितले की, त्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना विश्वचषक सामन्यासारखा नसून द्विपक्षीय मालिकेसारखा वाटला. मिकी आर्थर म्हणाले, ‘खरं सांगायचं तर हा सामना आयसीसीच्या टूर्नामेंटसारखा वाटत नव्हता. तो द्विपक्षीय मालिकेसारखा दिसत होता, बीसीसीआयचा हा एक कार्यक्रम आहे असे एका क्षणी वाटून गेले. अहमदाबाद स्टेडियममधील स्पीकर किंवा मायक्रोफोनवर ‘दिल दिल पाकिस्तान’चा आवाज मला ऐकू आला नाही. हे निश्चितपणे एक गोष्ट दर्शवते पाकिस्तानच्या चाहत्यांना या सामन्यासाठी परवानगी नव्हती. परंतु, मी ते निमित्त म्हणून वापरणार नाही कारण आमच्यासाठी ते क्षण जगण्यासारखे होते. या सामन्यात आपण भारतीय खेळाडूंचा कसा सामना करणार आहोत यावरच हा सामना होता.”

आर्थरला अंतिम फेरीत भारताचा सामना करायचा आहे

आर्थर पुढे म्हणाले, “ही एक मोठी वर्ल्ड कपची मोहीम आहे. आम्ही आतापर्यंत फक्त तीन सामने खेळले असून त्यातील दोन जिंकले आहेत. आम्ही काही सामन्यांमध्ये चांगले खेळलो आहोत. परंतु मला वाटते की, आम्ही अद्याप आमचा सर्वोत्तम खेळ केला नाही.” त्यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले. आर्थर म्हणाले, “हा भारतीय संघ अतिशय अद्भुत कामगिरी करत आहे. मला वाटते की राहुल आणि रोहितच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया चांगली प्रगती करत आहे. त्याचा संघ सध्या खूप दिसत मजबूत आहे. मला वाटते त्यांनी त्यांच्या संघातील सर्व उणिवा दूर केल्या आहेत. मी अंतिम फेरीत त्याच्याशी पुन्हा सामना करण्यास उत्सुक आहे.”

हेही वाचा: IND vs PAK: विराट-सचिनची ग्रेट-भेट! भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान क्रिकेटचा देव भेटला किंग कोहलीला, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाखो भारतीय चाहते उपस्थित होते, तर पाकिस्तानी चाहत्यांची उपस्थिती फारच कमी होती. व्हिसाच्या समस्येमुळे पाकिस्तानी चाहते भारतात पोहोचू शकले नाहीत. अहमदाबादमध्ये भारताकडून पाकिस्तानला सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. कर्णधार बाबर आझमने ५० धावांची तर मोहम्मद रिझवानने ४९ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने ८६ धावा केल्या.