जागतिक कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा

भारतीय महिलांनी जागतिक कलात्मक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी निराशा केली. वैयक्तिक प्रकारात भारताच्या एकाही खेळाडूला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

महिलांच्या ऑल-राऊंड प्रकाराच्या पात्रता फेरीत प्रणती नायकला ४५.८३२ गुणांसह १२७व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्रणती दासने ४५.२४८ गुण मिळवत १३२वा क्रमांक पटकावला. व्हॉल्ट प्रकारात प्रणती नायकने पहिल्या प्रयत्नात १४.२०० गुण मिळवले, पण दुसऱ्या प्रयत्नात तिच्या गुणांमध्ये कपात करण्यात आली. त्यामुळे या प्रकारात तिला २७वे स्थान मिळवता आले.

अनइव्हन बार प्रकाराच्या पात्रता फेरीत प्रणती नायक, प्रणती दास आणि अरुणा रेड्डी यांना अनुक्रमे १०.५६६, ९.९१६ आणि ८.९२५ गुणांसह १६४व्या, १८२व्या आणि १९३व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बॅलन्स बीम प्रकारात प्रणती दास (१०.८६६ गुण), अरुणा रेड्डी (१०.२००) आणि प्रणती नायक (९.९३३) अनुक्रमे १३८व्या, १६४व्या आणि १७४व्या क्रमांकावर राहिल्या.

फ्लोअर एक्सरसाइज प्रकाराच्या पात्रता फेरीत प्रणती दास (११.४६६ गुण) आणि प्रणती नायक (११.१३३) यांनी अनुक्रमे १५१वे आणि १७९वे स्थान पटकावले.