मुंबई : महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या आठपैकी चार खेळाडू भारताच्या असणे हे मोठे यश आहे. त्यातही दिव्या देशमुखची कामगिरी लक्षवेधी आणि अतुलनीय ठरते. वयाने सर्वांत लहान असूनही तिने स्पर्धेत आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या बुद्धिबळपटूंना पराभूत केले आहे. खेळाची आक्रमक शैली, उचित निर्णयक्षमता आणि निडरपणा यांसारख्या गुणांमुळे भविष्यात ती जगज्जेतेपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकते, असे मत ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.
जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटूंनी ऐतिहासिक यश मिळवले आहे. दोन वर्षांपूर्वी द्रोणावल्ली हरिकाने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती आणि अशी कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय होती. यंदा मात्र महिला विश्वचषकाच्या तिसऱ्या पर्वात भारताकडून हरिका, कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली या ‘ग्रँडमास्टर’ खेळाडूंसह नागपूरची १९ वर्षीय ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ दिव्यानेही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडू थेट ‘कँडिडेट्स’साठी पात्र ठरणार असल्याने भारतीय बुद्धिबळपटूंचे यश अधिकच खास ठरते. ‘कँडिडेट्स’मधील विजेतीला जगज्जेत्या जू वेन्जूनला किताबासाठी आव्हान देण्याची संधी मिळेल.
‘‘महिला विश्वचषकात भारताच्या चार आणि चीनच्या तीन खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. यावरुन दोन देशांचे वर्चस्व अधोरेखित होते. भारताच्या वंतिक अग्रवाल आणि के. प्रियांका यांनीही चांगला खेळ केला. मात्र, ज्या खेळाडूंच्या कामगिरीत अधिक सातत्य होते, त्यांचीच घोडदौड कायम राहिली. अव्वल आठमध्ये स्थान मिळविलेल्या खेळाडूंत सर्वांत लक्षवेधी कामगिरी दिव्याने केली आहे. तिने बऱ्याच अनुभवी खेळाडूंवर मात केली. विशेषत: उपउपांत्यपूर्व फेरीत तिने द्वितीय मानांकित चीनच्या झू जिनेरवर मिळविलेला विजय फारच अप्रतिम होता,’’ असे ठिपसे म्हणाले.
‘‘उचित निर्णयक्षमता हा दिव्याचा खास गुण आहे. पटावरील स्थिती कशीही असली, तरी त्यातून मार्ग काढण्यात ती पटाईत आहे. प्रतिस्पर्ध्याला चूक करण्यास ती भाग पाडते, मग मिळवलेले वर्चस्व सोडत नाही. वैशालीकडेही हा गुण आहे. मात्र, या स्पर्धेत तिला काहीअंशी नशिबाचीही साथ लाभली आहे. हम्पी अपेक्षेनुसार परिपक्व खेळ करत आहे. हरिकाला चमकदार विजय मिळवता आलेला नाही. नियमित डाव बरोबरीत सोडवून मग जलद ‘टायब्रेकर’मध्ये ती बाजी मारत आहे. या तिघींच्या तुलनेत दिव्याची कामगिरी अधिक दर्जेदार ठरते,’’ असे ठिपसे यांनी सांगितले.
उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्यांमध्ये सहा ग्रँडमास्टर खेळाडू आहेत. दिव्या आणि चीनची सॉन्ग युशीन या दोघींनाच अद्याप हा किताब मिळवता आलेला नाही. त्यातही दिव्या अधिक युवा असल्याने तिची कामगिरी अतुलनीय ठरते आहे.
प्रायोजक, सरकारची मदतही गरजेची
●बुद्धिबळात जगज्जेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण दिव्यामध्ये आहेत. पुढील दोन-तीन वर्षे तिने योग्य मेहनत घेतली, तिला आवश्यक मार्गदर्शन मिळाले, तर भविष्यात ती निश्चितपणे जगज्जेती होऊ शकते, असे ठिपसे म्हणाले.
●दिव्याला सरकार, प्रायोजक आणि बुद्धिबळ संघटनेचे सहकार्यही आवश्यक आहे. आपल्यासमोर तमिळनाडूचे उत्तम उदाहरण आहे. राज्यातील खेळाडू भारतीय संघात आला की, तेथील अनेक लोक पुढे येऊन या खेळाडूंना लाखोंची मदत करतात. असेच आपल्याकडेही झाले पाहिजे, असे मत ठिपसेंनी मांडले.
●गुकेश जगज्जेता झाला. मात्र, त्याआधी तो ‘कँडिडेट्स’साठी पात्र ठरतो की नाही, अशी स्थिती होती. अशा वेळी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, तमिळनाडू बुद्धिबळ संघटना आणि तेथील सरकारने मिळून विशेष स्पर्धा आयोजित केली.
●यात गुकेश विजेता ठरला आणि त्याला ‘कँडिडेट्स’मध्ये प्रवेश मिळविण्यास मदत झाली. अशा प्रकारचा पाठिंबा दिव्या आणि वंतिका अग्रवाल यांसारख्या होतकरू महिला बुद्धिबळपटूंनाही मिळायला हवा, असे ठिपसे म्हणाले.
दिव्यामध्ये तडफदारपणा आहे. ती आक्रमक चाली रचून प्रतिस्पर्ध्याला दडपणाखाली आणते. विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत तिने जिनेरविरुद्ध ज्या प्रकारे डाव उलटवला, ते खरोखरच कमालीचे होते. उपांत्य फेरी गाठण्याची तिला उत्तम संधी आहे. ती आणि हम्पी आगेकूच करतील असा माझा अंदाज आहे. – प्रवीण ठिपसे