ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला गटाच्या जेतेपदासाठी अनोखा मुकाबला रंगणार आहे. आपल्या सातत्यपूर्ण खेळाने आशियाई खंडातील टेनिसला चालना देणारी लि ना आणि ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारणारी स्लोव्हाकियाची डॉमिनिका सिबुलकोव्हा यांच्यात जेतेपदाची झुंज रंगणार आहे.
वय, कर्तृत्व आणि अनुभव या तिन्ही मुद्यांवर लि ना हिचे पारडे जड आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची ३१ वर्षीय लि नाची ही तिसरी वेळ असणार आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभव असल्यामुळे लि नाला जेतेपदाची अधिक संधी आहे.
मारिया शारापोव्हा आणि अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का अशा अव्वल खेळाडूंना नमवण्याची किमया साधणाऱ्या सिबुलकोव्हासाठी ही पहिली ग्रँड स्लॅम अंतिम लढत असणार आहे. आक्रमक खेळासह कोर्टचा सुरेख उपयोग करणारी सिबुलकोव्हा आपल्या तडफदार खेळाने लि नाला प्रत्युत्तर देऊ शकते. अनुभव आणि युवा ऊर्जा यांच्यातील ही लढत टेनिसरसिकांना दर्जेदार खेळाची पर्वणी देणारी ठरेल. बऱ्याच कालावधीनंतर ग्रँड स्लॅम जेतेपदांवरील विल्यम्स भगिनींची मक्तेदारी संपुष्टात आल्याने एक नवा विजेता या लढतीद्वारे मिळणार आहे.