Haris Rauf On IND vs PAK Match: आशिया चषक २०२५ स्पर्धेचा थरार येत्या ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे दोन्ही संघ भिडणार आहेत. तर सर्व क्रिकेट चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो भारत- पाकिस्तान सामना १४ सप्टेंबरला रंगणार आहे. दोन्ही संघ एकमेकांविरूद्ध खेळताना विजय मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावतात. आगामी आशिया चषकासाठी दोन्ही संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघ कमीत कमी २ वेळा आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, तर ३ वेळा आमनेसामने येऊ शकतात. या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघ नेहमीच वरचढ राहिला आहे. पण हारिस रौफला वाटतंय की, आगामी आशिया चषकातील दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा संघ भारतीय संघाला पराभूत करेल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका चाहत्याने त्याला भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना हारिस रौफ म्हणाला, ” दोन्ही आपलेच आहेत, इंशाअल्लाह…”, हारिस रौफच्या मते, पाकिस्तानचा संघ दोन्ही सामने सहज जिंकेल. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी हारिस रौफची फिरकी घ्यायला सुरूवात केली आहे.
या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, या संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेलं नाही. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाची जबाबदारी सलमानकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान संघातील सर्वात अनुभवी फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला या स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
हा सामना होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्य तणावपूर्वक वातावरण आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानसोबत खेळणार नसल्याचं म्हटलं जात होतं. पण आता भारत सराकारने पाकिस्तानविरूद्ध खेळण्यास हिरवं कंदील दाखवलं आहे. त्यामुळे यूएईत होणाऱ्या सामन्यात हे दोन्ही संघ भिडताना दिसतील.