टी २० विश्वचषकासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना काही खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हार्दीक पांड्या, राहुल चाहर आणि इशान किशनसारखे खेळाडूंच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युजवेंद्र चहलला संघात स्थान मिळालेलं नाही. मात्र माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं निवडलेल्या खेळाडूंमध्ये कोणताही बदल न करण्याचा सल्ला दिला आहे. निवड केलेल्या खेळाडूंवर विश्वास ठेवला पाहीजे, असं मत त्याने व्यक्त केलं आहे.

“मला वाटत, संघात कोणताही बदल करू नये. जेव्हा आपण १५ जणांची निवड करता तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवूनच त्यांची निवड केली जाते. अपेक्षांवर त्यांची निवड केली जात नाही. अपेक्षांच्या आधारावर प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करेल असं होत नाही”, असं गौतम गंभीरनं ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं. “निवडलेले १५ खेळाडू आपल्याला वर्ल्डकप जिंकून देतील यावर ठाम राहिलं पाहीजे. कधी कधी चांगले चांगले खेळाडूही फॉर्ममध्ये नसतात. जिथपर्यंत एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होत नाही, तो पर्यंत मी तरी संघात कोणताच बदल करणार नाही”, असं गंभीरने पुढे सांगितलं.

टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात चार फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. यात जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, राहुल चाहर, अक्षर पटेल, आर. अश्विन, वरुण चक्रवर्ती, हार्दीक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांची निवड केली आहे. जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती हे चार गोलंदाज आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करत आहेत. मात्र फिरकीपटू आर. अश्विनच्या गोलंदाजीची छाप पडताना दिसत नाही.

भारतीय संघ
फलंदाज- विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव
गोलंदाज- जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
अष्टपैलू खेळाडू- हार्दीक पांड्या, रवींद्र जडेजा
फिरकीपटू- राहुल चाहर, अक्षर पटेल, आर. अश्विन, वरुण चक्रवर्ती
यष्टीरक्षक- केएल राहुल, ऋषभ पंत, इशान किशन
राखीव खेळाडू- श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर