आशिया हा वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवणारा खंड.. जागतिक लोकसंख्येत आघाडीवर असलेली चीन आणि भारत ही दोन राष्ट्रे याच खंडातली.. त्या तुलनेत मालदीवची लोकसंख्या आहे फक्त साडेतीन लाख.. याच खंडात पृथ्वीतलावरील स्वर्ग मानले जाणारे भूतान आहे आणि सीरिया, पाकिस्तानसारखे नेहमीच धुमसत असणारे देशही. राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक वैराचे अनेक कंगोरे तेथील संघर्षांला आहेत.. आशियाई क्रीडा स्पध्रेच्या निमित्ताने याच विविधतेचे विविध पैलू प्रकर्षांने दिसून येतात.
यजमान दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियातील हाडवैराचे अनेक नमुने आशियाई क्रीडा स्पध्रेतही पाहायला मिळत आहेत. याचप्रमाणे आणखीही काही वादग्रस्त गोष्टी समोर येत आहेत. स्पध्रेला प्रारंभ होताना जपानच्या हॉकी संघातील एका खेळाडूने द. कोरियाच्या शाळकरी मुलीच्या शर्टाला जपानचा छोटा राष्ट्रध्वज उत्साहाच्या भरात लावला आणि त्याचे तीव्र पडसाद नगरीमध्ये उमटले. कोरिया हा एके काळी जपानच्याच आधिपत्याखाली होता. परंतु दुसऱ्या महायुद्धात जपान पराभूत झाल्यानंतर उत्तर कोरियावर सोव्हिएत राष्ट्रांचे तर दक्षिण कोरियावर अमेरिकेचे नियंत्रण आले. १९४८ मध्ये दोघांनाही स्वतंत्र राष्ट्रांचा दर्जा देण्यात आला. परंतु १९५० ते ५३ या कालखंडात या सख्ख्या भावंडांमध्ये कोरियन युद्ध झाले. या दोन देशांमधील युद्धजन्य स्थितीचा प्रत्यय वारंवार येत असतो.
अनेक आशियाई राष्ट्रांच्या सीमांवर ‘नेमेची आम्हां युद्धाचा प्रसंग’ अशीच स्थिती असते. चीनचे जवळपास सर्वच शेजारी राष्ट्रांशी वाद आहेत. जपानचे चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान (चायनीज तैपेई अधिकृत नाव) या देशांशी काही मतभेद आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमा तर गेली अनेक वष्रे तणावग्रस्त आहेत. काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे आहेत, दुसरीकडे काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशांच्या सीमेवर चीनच्या लष्करी कारवायासुद्धा सुरू आहेत. हेच वैर मग खेळांच्या मैदानांवरसुद्धा दिसून येते. भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणत्याही सामन्याला मग वेगळे महत्त्व प्राप्त होते.
आशियाई स्पध्रेचे ईप्सित साध्य व्हावे म्हणून मध्य-पूर्वेकडील काही राष्ट्रेसुद्धा या खेळाचा भाग आहेत. पॅलेस्टाइनचे खेळाडू या स्पध्रेत सहभागी झाले आहेत; परंतु इस्रायलवर आशियाई ऑलिम्पिक परिषदेने १९८१ मध्ये बंदी घातल्यामुळे ते सहभागी होऊ शकलेले नाहीत. १९५४ ते १९७४ या कालखंडात आशियाई स्पध्रेत ते सहभागी झाले होते. अजूनही दहशतग्रस्त असलेल्या, युद्धाने होरपळत असलेल्या अफगाणिस्तान आणि इराक या मुस्लीम राष्ट्रांच्या खेळाडूंनी या स्पध्रेत हिरिरीने भाग घेतला आहे. अफगाणिस्तान, नेपाळ, लाओस आणि कंबोडियासारखे देश परिस्थिती, सोयीसुविधा आणि प्रशिक्षण यांचे पुरेसे पाठबळ नसतानाही आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सौदी अरेबियाच्या २०२ खेळाडूंच्या चमूत एकाही महिलेचा जाणीवपूर्वक समावेश नाही. या भेदभावावर मानव हक्क आयोगानेही ताशेरे ओढले आहेत.
आशियाई क्रीडा स्पध्रेचा इतिहाससुद्धा रंजक आहे. १९१२ पासून ‘पूर्वेकडील राष्ट्रांच्या स्पर्धा’ (फार ईस्टर्न गेम्स) या नावाने होणाऱ्या क्रीडा स्पध्रेत जपान, फिलिपाइन्स आणि चीन हे देश सहभागी व्हायचे. परंतु या राष्ट्रांमधील मतभेदांमुळे १९३८ मध्ये या स्पर्धा रद्द झाल्या आणि मग त्यानंतर त्या कधीही झाल्या नाहीत. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक आशियाई राष्ट्रे स्वतंत्र झाली. १९४८ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकच्या वेळी या आशियाई राष्ट्रांनी पुन्हा संघटित होऊन क्रीडा स्पध्रेच्या आयोजनाचे धोरण आखले. त्यानुसार पहिल्यावहिल्या आशियाई क्रीडा स्पध्रेचे यजमानपद नवी दिल्लीला मिळाले. त्या वेळी नऊ क्रीडाप्रकारांमध्ये फक्त ११ देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. यंदाचे यजमान दक्षिण कोरियाने आशियाई ऑलिम्पिक परिषदेशी संलग्न असलेल्या सर्व ४५ सदस्य राष्ट्रांना आशियाई स्पध्रेत सहभागी करून घेण्यात यश मिळवले आहे. ४३९ सुवर्णपदकांचे स्वप्न डोळ्यांत घेऊन सुमारे दहा हजार खेळाडू या स्पध्रेत उतरले आहेत.
आशियाई पदक हे विश्वचषक किंवा ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रेरणा देते. तसेच आशियाई स्पध्रेचे संयोजनसुद्धा मोठय़ा स्पध्रेच्या यजमानपदाची पायाभरणी करते. जपानमध्ये २०२० चे ऑलिम्पिक होणार आहे. दक्षिण कोरियात २०१८ च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत, तर २०२२ मध्ये कझाकिस्तानला होण्याची चिन्हे आहेत. बीजिंगने २००८ चे ऑलिम्पिक यजमानपद यशस्वीपणे भूषवले आहे. पुढील (२०१८ मध्ये) आशियाई स्पध्रेचे यजमानपद इंडोनेशियाला मिळाले आहे. १९६२ मध्ये जेव्हा जकार्तामध्ये आशियाई स्पर्धा झाल्या तेव्हा याच देशाने काही अरब राष्ट्रे आणि चीनच्या सांगण्यावरून इस्रायल आणि तैवानच्या खेळाडूंना स्पध्रेसाठी व्हिसा नाकारला होता. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इंडोनेशियावर तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घातली होती. पण आता तशी परिस्थिती नाही.
द. कोरिया व जपानने फिफा विश्वचषकाचे यजमानपद २००२ मध्ये यशस्वीपणे सांभाळले होते. याचप्रमाणे १९८७ मध्ये भारताने पाकिस्तानसोबत, १९९६ मध्ये भारत-पाकिस्तान-श्रीलंका यांनी आणि २०११ मध्ये भारताने श्रीलंका आणि बांगलादेशसोबत विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचे यशस्वीपणे आयोजन करून दाखवले आहे. आशियाई राष्ट्रांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य आशियाई क्रीडा स्पध्रेच्या निमित्ताने होते आहे. ‘‘जर आपण दोघांनी एक रुपयाची देवाणघेवाण केली, तर प्रत्येकाकडे एक रुपया असेल. परंतु जर आपण दोघांनी एकेका चांगल्या विचाराची देवाणघेवाण केली, तर प्रत्येकाकडे दोन चांगले विचार असतील,’’ असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. जगात शांती, मैत्री आणि प्रेम यांच्या धाग्यांनिशी विश्वबंधुत्वाची जोपासना करण्यासाठी विवेकानंदांच्या याच विचारांची आशियाई राष्ट्रांना गरज आहे.