चेन्नईत सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका- पाकिस्तान लढतीदरम्यान डीआरएस अर्थात डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा तांत्रिक गोंधळ पाहायला मिळाला. काँकशन सबस्टिट्यूट म्हणून संधी मिळालेला उस्मान मीर गोलंदाजीसाठी आला. त्याच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज रासी व्हॅन डर डुसेविरुद्ध अपील झालं. अंपायर पॉल रायफेल यांनी डुसे बाद असल्याचा कौल दिला. डुसेने तातडीने रिव्ह्यू घेतला.

तिसऱ्या अंपायरसाठी प्रक्रिया सुरू झाली. बॉल ट्रॅकिंग टेक्नॉलॉजीनुसार चेंडू स्टंप्स मिसिंग म्हणजे दूर जात होता. पण काही सेकंदात बॉल ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी रिलोड झाली. दुसऱ्या खेपेस मात्र चेंडू स्टंप्सवर आदळत असल्याचं दिसलं. यामुळे मैदानावरील पंचांचा निर्णय तसाच राहील हे स्पष्ट झालं. तिसरे अंपायर रे इलिंगवर्थ यांनी मैदानावरील अंपायर पॉल रायफल यांना निर्णय कायम ठेवण्यास सांगितलं. चाहत्यांना काही कळायच्या आत हा बदल झाला. मात्र चाणाक्ष चाहत्यांनी मागे जाऊन हा प्रसंग पाहिला आणि सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागले.

सोशल मीडियावर असंख्य चाहत्यांनी बॉल ट्रॅकिग टेक्नॉलॉजी तंत्रशुद्ध नसल्याचं म्हटलं. बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञान जर अद्ययावत नसेल तर कशाला वापरता असंही अनेकांनी म्हटलं. डीआरएसमध्ये तांत्रिक गोंधळ होऊ शकतो हे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालं असं अनेक चाहत्यांचं म्हणणं होतं. प्राथमिक फेरीच्या लढतीत हे झालं. सेमी फायनल किंवा फायनलसारख्या अतिशय दडपणाच्या सामन्यात असं झालं तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही अनेक चाहत्यांनी केला.

रासी व्हॅन डर डुसे हा आफ्रिकेचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज होता. तो बाद होणं आफ्रिकेसाठी सामन्याचा निकाल पालटवणारं ठरु शकतं. दुसरीकडे पाकिस्तानला बाद फेरीचं आव्हान जिवंत राखण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक विकेट महत्त्वाची आहे.