वृत्तसंस्था, पुणे : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या चर्चेत राहिलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी उमेश सिन्हांनी अधिकृतरीत्या जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्देश आणि मंजूर करण्यात आलेल्या ‘आयओए’च्या नव्या घटनेनुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
‘आयओए’च्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या अर्जाची छाननी २९ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. कार्यक्रमात अर्ज माघार घेण्यासाठी या वेळी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नव्या घटनेतील तरतुदीनुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. अर्ज माघार घेण्यासाठी १, २ आणि ३ डिसेंबर असे तीन दिवस देण्यात आले आहेत. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर निवडणुकीच्या शर्यतीत राहिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर १० डिसेंबरला निवडणूक पार पडेल आणि त्याच दिवशी निवडणुकीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.