मँचेस्टर : स्नायूच्या दुखापतीमुळे आकाश दीपला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नसल्याचे भारताचा कर्णधार शुभमन गिलने स्पष्ट केले. त्याने अंतिम संघनिवडीबाबत भाष्य करणे टाळले, परंतु वेगवान गोलंदाज अंशुल कम्बोजला पदार्पणासाठी फारकाळ वाट पाहावी लागणार नसल्याचे त्याने सांगितले. तसेच करुण नायरचे स्थान कायम राहणार असल्याचे संकेतही त्याने दिले.
आकाश दीप आणि अर्शदीप सिंग जायबंदी असल्याने आज, बुधवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीला मुकणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी कम्बोज आणि प्रसिध कृष्णा यांच्यात स्पर्धा आहे. ‘‘खेळाडू जायबंदी झाल्यानंतर संघनिवड करणे सोपे नसते. नितीश रेड्डी उर्वरित मालिकेला मुकणार आहे. आकाश आणि अर्शदीप पुढील सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. मात्र, आमच्या संघात गुणवान खेळाडूंची कमी नाही. कसोटी जिंकण्यासाठी आवश्यक २० बळी मिळवू शकतील असे गोलंदाज आमच्याकडे आहेत,’’ असे चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत गिल म्हणाला.
‘‘कम्बोजला पदार्पणासाठी फारकाळ वाट पाहावी लागणार नाही. मात्र, तो या सामन्यात खेळेलच असेही नाही. आम्ही सकाळी खेळपट्टी पाहून योग्य तो निर्णय घेऊ. सध्या त्याच्यात आणि प्रसिधमध्ये स्पर्धा आहे. कम्बोजमधील क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तो भारताला सामने जिंकवू शकतो असे आम्हाला वाटते. त्यामुळे त्याला चमूत स्थान देण्यात आले आहे,’’ असे गिलने सांगितले.
दरम्यान, पहिल्या तीन कसोटीत संधी मिळूनही एकही अर्धशतक न करू शकलेल्या करुणचे स्थान कायम राहणार असल्याचे संकेतही गिलने दिले आहेत. ‘‘आम्ही करुणशी संवाद साधला आहे. आमच्या मते, तो चांगली फलंदाजी करत आहे. आम्ही केवळ धावांबाबत विचार करत नाही. पहिल्या सामन्यात त्याला आवडत्या (तिसऱ्या) क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली नाही. कोणत्याही खेळाडूला अशा प्रकारच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय पुनरागमन करणे सोपे गेले नसते. आम्हाला करुणवर विश्वास आहे,’’ असे गिल म्हणाला.
इंग्लंडची अ-खिलाडूवृत्ती
लॉर्डस येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी खिलाडूवृत्ती दाखवली नाही, असा दावा गिलने केला आहे. तिसऱ्या दिवसअखेरीस भारतीय संघाचा डाव संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडला सात मिनिटे फलंदाजी करायची होती. मात्र, इंग्लंडचे सलामीवीर ९० सेकंद उशिराने खेळपट्टीवर आले. हे खेळभावनेच्या विरोधात होते, असे गिल म्हणाला. इंग्लंडला दिवसअखेरीस कमीतकमी षटके खेळायची होती हे समजण्यासारखे आहे. मात्र, तुम्ही अशा प्रकारे वेळ दवडणे उचित नाही, असे गिलने सांगितले.