पाकिस्तान आणि इंग्लंड संघांत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना सोमवारी पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला ३५५ धावांचे लक्ष्य दिले होत. परंतु पाकिस्तान संघाचा डाव ३२८ धावांवर आटोपला. त्यामुळे पाहुण्या संघाने यजमानांवर २६ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. इंग्लंड संघाने २२ वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा करताना सलग दुसरा सामना जिंकला आहे.

इंग्लंडने पहिल्या डावात २८१ धावा आणि दुसऱ्या डावात २७५ धावा केल्या होत्या. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला पहिल्या डावात केवळ २०२ धावा करता आल्या. अशाप्रकारे त्यांना ३५५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पाकिस्तानचा लेगस्पिनर अबरार अहमदने पदार्पणाच्या कसोटीत ११ विकेट घेतल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मायदेशात सलग दुसऱ्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा पराभव झाला. याआधी ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत त्यांचा १-० असा पराभव केला होता.

सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानने दुसऱ्या डावात ४ बाद १९८ धावांरुन पुढे खेळायला सुरुवात केली. रूटने संघाला पहिला धक्का दिला. फहीम अश्रफ १० धावा करून बाद झाला. २१० धावांत ५ विकेट पडल्यानंतर सौद शकील आणि मोहम्मद नवाज यांनी संघाला सांभाळले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८० धावा जोडून सामना रोमांचक बनवला. मात्र नवाज ४५ धावा करून वेगवान गोलंदाज मार्क वुडचा शिकार ठरला. त्याने ६२ चेंडूंचा सामना केला. ज्यामध्ये त्याने ७ चौकार लगावले.

शकीलला पूर्ण करता आले नाही शतक –

शकीलने सामन्यात चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात ६३ धावा करणाऱ्या शकीलने दुसऱ्या डावातही २१३ चेंडूत ९३ धावांची संघर्षपूर्ण खेळी केली. वुडनेही त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अबरार अहमदने १७ धावा केल्या तर जाहिद मोहम्मद खातेही उघडू शकला नाही. संघाच्या ९ विकेट ३१९ धावांत पडल्या होत्या. ओली रॉबिन्सनला शेवटची विकेट मिळाली. त्याने मोहम्मद अलीला यष्टिरक्षक ओली पोपकरवी झेलबाद केले. आघा सलमान २० धावा करून नाबाद राहिला. वेगवान गोलंदाज मार्क वुडने दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – MS Dhoni: चक्क! रस्त्यावर चाहत्याच्या पाठीवर ऑटोग्राफ देताना दिसला धोनी, व्हिडिओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवा कर्णधार झाल्यानंतर बेन स्टोक्सने केवळ एकच कसोटी गमावली आहे. प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि स्टोक्स या जोडीने आतापर्यंत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीनंतर स्टोक्सला जो रूटच्या जागी कर्णधारपद मिळाले. तिसरी आणि शेवटची कसोटी १७ डिसेंबरपासून कराचीमध्ये खेळवली जाणार आहे. इंग्लिश संघ बऱ्याच काळानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत आहे.