ENG vs SA 2rd ODI: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली असून, मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने याआधी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत केलं आणि आता इंग्लंडवरही मालिका विजय मिळवला आहे. हा विजय दक्षिण आफ्रिकेसाठी अतिशय खास आहे. कारण २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळताना वनडे मालिका जिंकली आहे. याआधी तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. आता इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला पराभूत केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडवर दणदणीत विजय

गेल्या २७ वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला पराभूत करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले, पण असं होऊ शकलं नव्हतं. पण २०२५ मध्ये तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकेने हा पराक्रम करून दाखवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला, तर दु्सऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर विजयासाठी ३३१ धावांचे आव्हान ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना ट्रिस्टन स्टब्स आणि मॅथ्यू ब्रित्जके यांनी दमदार अर्धशतकं झळकावली.

इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ५० षटकात ३३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला ५० षटकांअखेर ९ गडी बाद ३२५ धावांपर्यंत मजत मारता आली. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत रंगली. पण शेवटी दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत हा सामना ५ धावांनी आपल्या नावावर केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २-० ने विजयी आघाडी घेतली. याआधी १९९७ मध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयात सर्वांनीच मोलाचं योगदान दिलं, पण मॅथ्यू ब्रित्जके दक्षिण आफ्रिकेकडून चमकला. त्याने सलग ५ वेळेस ५ अर्धशतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ७७ चेंडूंचा सामना करत ८५ धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले.  ब्रित्जकेला स्टब्सची चांगली साथ मिळाली. दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३०० पार पोहोचवली. फलंदाजीत या दोघांनी कमाल केल्यानंतर गोलंदाजीत नांद्रे बर्गर आणि केशव महाराज यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना आव्हानाचा पाठलाग करण्यापासून रोखलं.