IND vs ENG 2nd Test England Squad Announced: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लिश संघ आघाडीवर आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारताचा ५ विकेट्सने पराभव करत १-० अशी आघाडी घेतली. यानंतर आता संघ दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये संघाचा स्टार वेगवान गोलंदाज ४ वर्षांनी कसोटी संघात परतला आहे.
लीड्स कसोटी विजयानंतर २ दिवसांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्त्वाखालील इंग्लिश संघाने भारताविरूद्ध सामन्यात चांगली कामगिरी केली. पण या सामन्यात इंग्लिश संघात अनुभवी गोलंदाजांची कमतरता दिसून आली. आता इंग्लंडचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज दुखापतीनंतर संघात परतल्याने संघ अधिक मजबूत झाला आहे.
इंग्लंडच्या संघात आता स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झालं आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून विविध दुखापतींशी झुंजणारा स्टार वेगवान गोलंदाज आर्चरला २ जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलं आहे.
इंग्लंडने आज २६ जूनला ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. लीड्स कसोटीसाठी संघातून कोणत्याही खेळाडूला वगळण्यात आलेले नाही. फक्त जोफ्रा आर्चरला संघात स्थान देण्यात आलं आहे. आर्चरचे पुनरागमन इंग्लंडच्या गोलंदाजीसाठी मोठा दिलासा देणारं आहे, कारण लीड्स कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये संघाच्या गोलंदाजीत अनुभवाची कमतरता दिसून आली. दोन्ही डावांमध्ये, टीम इंडियाच्या टॉप आणि मिडल ऑर्डरने मोठी धावसंख्या उभारली होती.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आर्चर ४ वर्षांहून अधिक काळानंतर पुनरागमन करत आहे. आर्चरने त्याच्या १३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ४२ विकेट घेतले आहेत. योगायोगाने, आर्चरने टीम इंडियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत दौऱ्यात आर्चरने त्याच्या कारकिर्दीतील १३ वा कसोटी सामना खेळला होता, परंतु काही दिवसांनी त्याला दुखापत झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या दुखापतींची मालिका सुरूच राहिली. त्यामुळे कसोटी संघात तो परतू शकला नाही.
भारताचा दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून बर्मिंगहम मध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात आता इंग्लंडच्या गोलंदाजी विभागात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला समाविष्ट केलं आहे.
भारताविरूद्ध दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स