कोरोना काळात वर्क फ्रॉम होम लोकप्रिय झालं. घरुन काम करणं अनेकांना सोयीचं वाटू लागलं. कंपन्यांना मात्र कर्मचारी भौतिकदृष्ट्या समोर नसल्याने अडचण वाटू लागली. अनेक कर्मचाऱ्यांनी दृष्टीआड सृष्टीचा फायदा उठवत मूनलायटिंग सुरू केलं. एखाद्या कंपनीत अधिकृत कर्मचारी म्हणून काम करत असतानाच फावल्या वेळात अन्य कंपनीसाठी किंवा वैयक्तिक पातळीवर वेगळं काम सुरू करणं. असं काम ज्यातून अर्थार्जन होईल. तांत्रिकदृष्ट्या आर्थिक कमाईचा स्रोत विशिष्ट कंपनी असली तरी प्रत्यक्षात अनेक माणसं मूनलायटिंग करुन वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमावू लागली. असं काम करुन पैसे कमावणं नैतिकतेत बसत नाही अशी ओरड झाली. त्याला मूनलायटिंग हे नाव मिळालं. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. इंग्लंडच्या संघातील एका क्रिकेटपटूने चक्क मूनलायटिंग केलं आहे. विशेष म्हणजे या मूनलायटिंगला इंग्लंड क्रिकेट बोर्डाची परवानगी आहे. काहीही? असं तुम्हाला वाटेल ना. काहीसं तसंच आहे. समजून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण.

इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांसाठी भारतात आहे. हैदराबाद आणि विशाखापट्टणम इथे पहिली आणि दुसरी कसोटी झाली. त्यानंतर तब्बल १० दिवसांची विश्रांती आहे. भारतीय क्रिकेटपटू आपापल्या घरी परतले तर इंग्लंडचा संघ श्रमपरिहारासाठी अबूधाबीला रवाना झाला. दौरा सुरू होण्याआधी इंग्लंडचा संघ युएईतच होता. आशियाई उपखंडातील खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी सराव व्हावा म्हणून त्यांचे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. आता ते ताण हलका करण्यासाठी तिथे गेले आहेत.

LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’

इंग्लंडच्या संघात डॅन लॉरेन्स नावाचा अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीबरोबरीने लॉरेन्स फिरकी गोलंदाजी टाकतो. उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. भारत दौऱ्यासाठी डिसेंबर महिन्यात इंग्लंडने संघाची घोषणा केली. त्यामध्ये लॉरेन्सचं नाव नव्हतं. इंग्लंडने लॉरेन्सऐवजी हॅरी ब्रूकला पसंती दिली. तडाखेबंद फलंदाजीसाठी ब्रूक प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानात झालेल्या मालिकेत ब्रूकने धावांची टांकसाळच उघडली होती. तो अनुभव लक्षात घेऊन निवडसमितीने ब्रूकला ताफ्यात समाविष्ट केलं. पण दौरा सुरू होण्यापूर्वीच इंग्लंडला धक्का बसला कारण वैयक्तिक कारणांसाठी ब्रूकने संपूर्ण दौऱ्यातून माघार घेतली. ब्रूकसारखा फलंदाज गमावणं हे निश्चितच मोठं नुकसान होतं. ब्रूकऐवजी इंग्लंडच्या निवडसमितीने डॅन लॉरेन्सची निवड केली.

भारतीय संघासाठी निवड न झाल्याने दुबईत सुरू असलेल्या IL20 स्पर्धेतील डेझर्ट व्हायपर्स संघाने लॉरेन्सला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आयत्या वेळी समाविष्ट केलं. कागदपत्रांची पूर्तता करुन लॉरेन्स इंग्लंडहून दुबईत दाखल झाला. व्हायपर संघासाठी एक सामना खेळला. तितक्यातच ब्रूकची बातमी त्याला कळली. निवडसमितीने त्याची निवड केल्याने त्याला भारतात जाणं भाग होतं. राष्ट्रीय संघासाठी खेळण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने लॉरेन्स भारतात दाखल झाला. मूळ योजनेचा हिस्सा नसल्याने इंग्लंड संघव्यस्थापनाने लॉरेन्सची अंतिम अकरात निवड केली नाही. लॉरेन्सने या काळात राखीव खेळाडूचं काम केलं. एनर्जी ड्रिंक, पाणी, किट, साहित्य-उपकरणं यांचा पुरवठा करण्याचं काम इमानेइतबारे केलं.

दुसरी टेस्ट भारताने जिंकली आणि मालिका १-१ बरोबरीत आली. यानंतर दहा दिवसांचा ब्रेक असल्याने इंग्लंडचा संघ श्रमपरिहारासाठी अबू धाबीला रवाना झाला. नेमकी हीच संधी डेझर्ट व्हायपर्स संघाने हेरली. लॉरेन्सला १० दिवसांची अधिकृत सुट्टी आहे. इंग्लंडचा संघ आपल्याच भागात आहे हे ओळखून डेझर्ट व्हापर्स संघाने इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे एनओसी मागितली. १० दिवसांमध्ये लॉरेन्स २ सामने खेळू शकतो, त्याला खेळण्याची परवानगी द्यावी अशी डेझर्ट व्हायपर्स संघाने विनंती केली. लॉरेन्स अंतिम अकरात नव्हता. तिसऱ्या टेस्टसाठी त्याची निवड होईल का शंका आहे. किमान त्याला खेळायला मिळेल या विचारातून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने लॉरेन्सला ट्वेन्टी२० लीगचे २ सामने खेळण्याची परवानगी दिली. बाकी संघ श्रमपरिहार करत असताना लॉरेन्स ट्वेन्टी२० सामने खेळला.

५ फेब्रुवारीला विशाखापट्टणम कसोटी संपली. ९ फेब्रुवारीला लॉरेन्स डेझर्ट व्हायपर्स संघासाठी खेळला. लॉरेन्सने दुबई कॅपिटल्सविरुद्ध खेळताना ११ चेंडूत १५ धावा केल्या. गोलंदाजी करताना एका षटकात १२ धावा दिल्या. शारजा वॉरियरविरुद्ध खेळताना लॉरेन्सने ३ षटकात २४ धावांच्या मोबदल्यात निरोशन डिकवेलाला बाद केलं. फलंदाजी करताना ७ चेंडूत ७ धावा केल्या. ठरल्याप्रमाणे २ सामने खेळून लॉरेन्स भारतात परतला. १५ तारखेपासून राजकोट इथे सुरू होणाऱ्या टेस्टसाठी तो निवडीसाठी उपलब्ध असेल.

या दोन सामन्यात खेळण्यासाठी लॉरेन्सला अर्थातच मानधन मिळेल. पण भारतात कसोटी संघाचा भाग असताना तिथून निघून प्रवास करुन अन्य एका प्रारुपात खेळण्यासाठी कौशल्य तर हवंच आणि मानसिक तसंच शारीरिक फिटनेसही हवा. लॉरेन्सने ही कणखरता दर्शवली. कठोर व्यावसायिकतेचं हे उदाहरण म्हणता येईल आणि त्याचवेळी पैशासाठी खेळाडूंनी किती खटाटोप करावा लागतो त्याचंही हे द्योतक आहे.