व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रात भलेही वेन रुनी व त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा दबदबा असेल, परंतु विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजय मिळविण्यासाठी प्रखर देशाभिमान पाहिजे व इंग्लंडचे खेळाडू नेमके यामध्ये कमी पडले, त्यामुळेच त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे, असे ज्येष्ठ फुटबॉल संघटक व प्रशिक्षक रघुवीर खानोलकर यांनी सांगितले. या स्पर्धेत स्पेनपाठोपाठ इंग्लंडसारख्या बलाढय़ संघाला साखळी गटातच गारद व्हावे लागले आहे. या संघांच्या पराभवाबाबत व स्पर्धेविषयी खानोलकर यांनी केलेली बातचीत-
*   इंग्लंडसारख्या संभाव्य विजेत्या संघाला येथे लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला, त्याविषयी काय सांगता येईल?
क्लब स्तरावरील सामने व आंतरदेशांमधील सामने यात खूपच तफावत असते. जेव्हा आपण देशासाठी खेळतो, तेव्हा व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून देशहितास प्राधान्य दिले पाहिजे. इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचाही अभाव दिसून आला. रुनी, गेरार्ड यांच्यासारखे खेळाडू व्यावसायिक संघाकडून नेहमीच चमकदार कामगिरी करतात. येथे मात्र त्यांची मात्रा चालली नाही.
*   गतविजेत्या स्पेनला साखळी गटातच बाद व्हावे लागेल अशी अपेक्षा तुम्हाला होती का?
गतवेळी विजेतेपद मिळविलेल्या स्पेन संघात गेल्या चार वर्षांमध्ये अनेक बदल घडले आहेत. त्यांचे अनेक अनुभवी खेळाडू स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झाले आहेत. त्याचा परिणाम यंदा त्यांना जाणवला आहे. अर्थात साखळी गटात पराभूत होण्याइतका हा संघ कमकुवत नव्हता. पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर त्या मानसिक धक्क्यातून त्यांचे खेळाडू सावरले गेले नाहीत. त्यामुळेच नंतरही त्यांची कामगिरी खराब होत गेली. तसेच त्यांच्या खेळाडूंना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या शैलीनुसार आपली व्यूहरचना करणे जमले नाही.
*  आतापर्यंतच्या कामगिरीवरून विजेतेपदासाठी कोणता संघ मुख्य दावेदार आहे असे तुम्हाला वाटते?
अर्थात मी जर्मनीला प्राधान्य देईन. त्यांच्या कामगिरीत सातत्य आहे. यापूर्वी आक्रमणावरच जर्मनीची मुख्य मदार असायची. आता बचावात्मक खेळातही त्यांच्या खेळाडूंनी लक्षणीय सुधारणा केली आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेत चमक दाखविणाऱ्या खेळाडूंचा त्यांच्या संघात समावेश आहे. थॉमस म्युलर हा अतिशय फॉर्ममध्ये आहे. त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल. जर्मनीखालोखाल नेदरलँड्स संघास जेतेपदाची अधिक संधी आहे. हे त्यांनी स्पेनला पराभूत करताना दाखविले आहे. यजमान ब्राझीलच्या खेळाडूंवर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतानाचे दडपण जाणवत आहे. त्यांच्याकडे चांगले नैपुण्य आहे, मात्र त्यांचे खेळाडू घरच्या मैदानावर खेळण्याचे विनाकारण दडपण घेतात.
*  या स्पर्धेच्या संयोजनाबाबत काय सांगता येईल?
ही स्पर्धा होईल की नाही अशी शंका निर्माण झाली होती. आता स्पर्धेतील साखळी सामनेही संपत आले आहेत. त्यामुळे स्पर्धेबाबत निर्माण झालेल्या शंका दूर झाल्या आहेत. एक मात्र निश्चित की, स्पर्धेच्या संयोजनात अनेक त्रुटी दिसत आहेत; तथापि सामन्यांचा दर्जा चांगला आहे. स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यांपैकी ६५ ते ७० टक्के सामन्यांमध्ये गोल पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना मिळाला आहे. फारसे सामने गोलशून्य बरोबरीत झालेले नाहीत ही या स्पर्धेची जमेची बाजू सांगता येईल.
* पंचांकडून चुकीचे निर्णय घेतले जात आहेत काय?
पंचांकडून हेतूपूर्वक चुका होत नसतात, कारण आता आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून चुका करणाऱ्या पंचांवर कडक कारवाई केली जाते. मात्र काही वेळा एखाद्या अव्वल दर्जाच्या संघांच्या सामन्यात पंच म्हणून काम करताना पंचांकडूनही काही वेळा नकळत चुका होत असतात. येथे त्याचा थोडासा प्रत्यय आला आहे.
* विश्वचषक फुटबॉलमध्ये भारतीय खेळाडू नेमके कोठे कमी पडतात?  
आपल्या संघाने १९५० मध्ये या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविले होते. त्या वेळी असलेला संघाचा दर्जा आजही तसाच आहे. फरक एवढाच की, अन्य देशांनी आपल्या तुलनेत या खेळात खूप प्रगती केली आहे. अन्य देशांप्रमाणेच आपण या खेळाच्या विकासावर भर दिला पाहिजे. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये या खेळाचे प्राथमिक प्रशिक्षण रुजविले पाहिजे. १२ ते १६ वर्षे या वयोगटात मुलांमधील खेळाडू घडविला पाहिजे. आता आपल्याकडे अनेक ठिकाणी परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अकादमी सुरू झाल्या आहेत. त्यांनी तळागाळातील नैपुण्य विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.
* सध्याच्या विश्वचषकापासून आपल्या संघटकांना काय बोध घेता येईल?
आपल्या देशात २०१७ मध्ये १७ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील चुकांची पुनरावृत्ती येथे घडणार नाही अशी काळजी आपल्या संघटकांनी घेतली पाहिजे. त्याचबरोबर या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी आतापासूनच संघबांधणी केली पाहिजे. ही स्पर्धा म्हणजे आपल्या देशात हा खेळ अधिकाधिक रुजविण्याची सुवर्णसंधी आहे हा दृष्टिकोन ठेवीत त्यानुसार प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आयोजित करण्यामागचे ध्येय साकार होईल.