ENG vs IND 4th Test : अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला, तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे १७१ धावांची आघाडी

दुसऱ्या डावात भारताच्या ९२ षटकात ३ बाद २७० धावा

England vs India fourth test day three match report
भारत-इंग्लंड कसोटी मालिका

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसअखेर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा भारताने आपल्या दुसऱ्या डावात ३ बाद २९२ धावा केल्या होत्या. भारताकडे आता १९१ धावांची आघाडी असून विराट कोहली २२ तर रवींद्र जडेजा ९ धावांवर नाबाद होते. सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी आणि त्याला चेतेश्वर पुजाराची लाभलेली साथ इंग्लंडसमोर दमदार आव्हान देण्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. रोहितने विदेशातील पहिलेच कसोटी शतक ठोकले, तर पुजाराने अर्धशतकी योगदान दिले. ही कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आहे.

भारताचा दुसरा डाव

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी तिसऱ्या दिवशी भारतासाठी अर्धशतकी सलामी दिली आहे. भारताच्या ८३ धावा झाल्या असताना जेम्स अँडरसनने राहुलला यष्टीपाठी झेलबाद केले. राहुलने ६ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा केल्या.  रोहितची साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजारा मैदानात आला. लंचनंतर रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. नंतर त्याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या पुजारासोबत शतकी भागीदारीही रचली. ६४व्या षटकात रोहितने वैयक्तिक ९४ धावांवर असताना षटकार ठोकत शतक साजरे केले. त्याचे हे भारताबाहेर कसोटीतील पहिलेच शतक ठरले. चहापानानंतर पुजाराने आपले ३१वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. नवा चेंडू घेतल्यानंतर इंग्लंडने ८१व्या षटकात रोहित आणि पुजाराला माघारी धाडले. रॉबिन्सनने या दोघांना झेलबाद केले. रोहितने १४ चौकार आणि एका षटकारासह १२७ तर पुजाराने ९ चौकारांसह ६१ धावा केल्या. या दोघांनंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी तिसऱ्या दिवसअखेर भारतासाठी खिंड लढवली.

इंग्लंडचा पहिला डाव

इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर आटोपला. भारतासारखीच इंग्लंडची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या जो रूटने डेव्हिड मलानसोबत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. वेगवान गोलंदाज उमेश यादवने सुरेख चेंडूवर रूटची दांडी गुल केली, रूटला २१ धावा करता आल्या. मलानही उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३१ धावा केल्या. अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर ओली पोपने सुरुवातीला जॉनी बेअरस्टो आणि त्यानंतर मोईन अलीसोबत भागीदारी रचली. सिराजने बेअरस्टोला आणि जडेजाने अलीला बाद केले. शतकाच्या जवळ पोहोचलेल्या  पोपला शार्दुलने बाद केले. त्याने पोपची ८१ धावांवर दांडी गुल केली. पोपने आपल्या खेळीत ६ चौकार ठोकले. पोपनंतर इंग्लंडचा डाव लवकर आटोपणार असे वाटत होते, पण ख्रिस वोक्सने ११ चौकारांसह झुंजार अर्धशतकी खेळी केली. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर बुमराह आणि जडेजाला दोन बळी घेता आले.

भारताचा पहिला डाव

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. पहिल्या डावात भारताने लीड्समधील कसोटीचा कित्ता गिरवायला सुरुवात केली. २० षटकात भारताने अवघ्या ३९ धावांत लोकेश राहुल (१७), रोहित शर्मा (११) आणि चेतेश्वर पुजाराला (४) गमावले. दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने रोहितला बाद केले. ओली रॉबिन्सनने राहुलला पायचित पकडले, तर जेम्स अँडरसनने पुजाराला यष्टीपाठी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. पुजारानंतर भारताने रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी बढती दिली. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. वोक्सने जडेजाला १० धावांवर बाद केले. लंचनंतर विराटने आपले अर्धशतक फलकावर लावले. चांगल्या लयीत दिसणारा विराट रॉबिन्सनचा बळी ठरला. रॉबिन्सनने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. विराटने ८ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. जडेजा-विराटनंतर अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतच्या जोडीकडून संघाला सावरण्यासाठी मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र दोघेही पुन्हा एकदा अपयशी ठरले. आज संधी मिळालेल्या शार्दुल ठाकूरने उमेश यादवला सोबत घेत ३१ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. शिवाय दोघांनी अर्धशतकी भागीदारीही फलकावकर लावली. ख्रिस वोक्सने शार्दुलला पायचित पकडले, शार्दुलने ३७ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ५७ धावा चोपल्या. शार्दुलनंतर इंग्लंडने भारताचा लवकर गाशा गुंडाळला. १९१ धावांवर भारताचा डाव आटोपला. इंग्लंडकडून वोक्सने चार, ऱॉबिन्सनने तीन बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड : रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: England vs india fourth test day three match report adn