लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला कसोटी सामना अनेकांना वर्षानुवर्षे लक्षात राहील. भारताने १५१ धावांनी हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या संघर्षामुळे हा सामना संस्मरणीय ठरला. या सामन्यादरम्यान जेम्स अँडरसन-विराट कोहली, अँडरसन-जसप्रीत बुमराह, जोस बटलर-बुमराह यांच्यात बरीच बाचाबाची झाली. विराट आणि अँडरसनचा वाद कॅमेऱ्यात कैद झाला होता, पण आतापर्यंत अँडरसन आणि बुमराहमध्ये काय घडले हे कोणालाच माहीत नव्हते. टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी त्यांच्यामध्ये काय घडले, याचा खुलासा केला आहे.

तिसऱ्या दिवशी बुमराहने अँडरसनविरुद्ध १० चेंडूंचे एक षटक टाकले, ज्यात अनेक नो-बॉलचा समावेश होता. बुमराहने अँडरसनला अनेक बाऊन्सर टाकले. आर. अश्विनच्या चॅनेलवरील संभाषणादरम्यान श्रीधर यांनी त्या वेळी या दोघांमध्ये काय घडले ते सांगितले. अँडरसनने बुमराहला सांगितले, ”तू ८०-८५ मील प्रति तास वेगाने गोलंदाजी करत होतास, पण ११वा फलंदाज येताच तू ९० मील प्रति तास वेगाने गोलंदाजी करायला सुरुवात केलीस.” मैदानावरुन परतताना बुमराहने अँडरसनला त्याने बाउन्सर हेतुपुरस्सर टाकले नव्हते, असे सांगितले.

 

श्रीधर म्हणाले, ”बुमराहने माफी मागितली, पण अँडरसनने त्याला किंमतच दिली नाही. त्यामुळे संघ नाराज झाला आणि पेटून उठला. या गोष्टीमुळे सर्वांना राग आला आणि त्यानंतर पाचव्या दिवशी सर्वांना त्याचा परिणाम दिसला.”

हेही वाचा – धक्कादायक..! भारताच्या अष्टपैलू क्रिकेटपटूवर रोलर चोरल्याचा आरोप

बुमराह दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याचा जोस बटलरशी वाद झाला. त्यानंतर त्याने मोहम्मद शमीसोबत नाबाद ८९ धावांची भागीदारी केली आणि ती भागीदारी सामन्याच्या दृष्टीने निर्णायक ठरली. भारताने इंग्लंडला ६० षटकांत २७२ धावांचे लक्ष्य दिले आणि इंग्लंड ५२ षटकांपूर्वी १२० धावांवरच आटोपला.