वेलिंग्टन : हॅरी ब्रूकचे (नाबाद १८४) झंझावाती शतक आणि त्याला अनुभवी जो रूटची (नाबाद १०१) मिळालेली मोलाची साथ यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याची अप्रतिम सुरुवात केली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी ६५ षटकांचाच खेळ झाला आणि यात इंग्लंडने ३ बाद ३१५ धावांची मजल मारली.

ब्रेंडन मॅककलमचे मार्गदर्शन आणि बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्येही आक्रमक शैलीत खेळत असून याचा ब्रूकला फायदा झाला आहे. कारकीर्दीतील सहावा कसोटी सामना खेळणाऱ्या ब्रूकने चौथे शतक झळकावले. दिवसअखेर ब्रूक १८४ धावांवर खेळत होता. त्याने या धावा केवळ १६९ चेंडूंत २४ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने केल्या.

रूटने संयमाने फलंदाजी करताना पहिल्या दिवशी १८२ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद १०१ धावांची खेळी केली. ब्रूक-रूट जोडीने चौथ्या गडय़ासाठी २९४ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेिलग्टन येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. मॅट हेन्रीने झॅक क्रॉली (२) आणि ऑली पोप (१०), तर कर्णधार टीम साऊदीने बेन डकेटला (९) झटपट माघारी धाडल्याने इंग्लंडची ३ बाद २१ अशी स्थिती झाली होती. यानंतर मात्र ब्रूक-रूट जोडीला रोखणे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना शक्य झाले नाही. १ कसोटी कारकीर्दीत केवळ ९ डावांत ८०० धावांचा टप्पा पार करणारा हॅरी ब्रूक हा क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी ९ कसोटी डावांत सर्वाधिक धावांचा विक्रम विनोद कांबळीच्या (७९८ धावा) नावे होता.